Current News Update : मोठी बातमी : मोठा पक्ष म्हणून राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेसाठी विचारणा

Advertisements
Advertisements
Spread the love


अपेक्षेप्रमाणे अखेर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष  असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच काल पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात भाजपचेच सरकार बनेल असे ठामपाने सांगितले होते मात्र कसे बनेल हे सांगायचे त्यांनी टाळले होते आणि आज लगेच त्यांना  मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले आहे.

Advertisements

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष लक्षात घेता राज्यपाल स्वतः सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते . आता महायुतीतील दोन्हीही पक्षांची तू तू -मै मै झाल्यानंतर अखेर  सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापन करण्याची आपल्या पक्षाची इच्छा आणि क्षमता आहे का?, अशी विचारणा राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता सत्ता स्थापन करायची की नाही, याचा निर्णय उद्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

Advertisements
Advertisements

राज्याच्या  विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत सत्ता संघर्ष सुरू झाला. दरम्यान शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला आणि दोन्हीही पक्षांची मने दुभंगली गेली.

कालच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर थेट शाब्दिक हल्ले  केले. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देत उद्धव यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शहा आणि कंपनी खोटे बोलत आहे आणि खोटारड्यांशी मी मैत्री ठेवत नाही, असे उद्धव म्हणाले. या संघर्षाचा अद्याप शेवट झालेला नसला व युती तुटलेली नसली तरी हे दोन्ही पक्ष लगेचच एकत्र येतील अशी कोणतीही  शक्यता नाही. त्यात या परिस्थितीत राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा नियमाप्रमाणे राज्यपालांकडे सोपवला. तो मंजूर करत राज्यपालांनी नवी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर टाकली . त्यानुसार फडणवीस सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आणि आता सरकार स्थापन करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.