Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mharashtra Politics : Deadline : सौ सुनारकी…. सत्ता स्थापनेच्या विलंबाला जबाबदार कोण ? कोणाचे बनणार सरकार?

Spread the love


विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १३ दिवस उलटून गेले तरी भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने राज्यात सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आज महाराष्ट्राचे सरकार बनविण्याची महाराष्ट्रातील महायुतीचा अखेरचा दिवस आहे . दरम्यान  काल दिवसभरात भाजप नेते महायुतीचंच सरकार येणार, असं छातीठोकपणे सांगत होते . काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोधी बाकावर बसण्याची भूमिका जाहीर केली आणि उद्धव ठाकरेंनीही युती तोडण्याचं पाप करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. अशा परिस्थितीत आज काय होणार ? हा प्रश्न सर्वांच्याच समोर असला तरी हे स्पष्ट आहे कि , या सर्व विलंबाला फक्त आणि फक्त शिवसेना जबाबदार आहे. कारण शिवसेना मागेल ते भाजप देणार नाही , हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असतानाही भाजप आपल्यासमोर लोटांगण घालून सरकार बनविण्यासाठी आपली मनधरणी करेल हा आत्मविश्वास सेनेला नडला आणि हि वेळ आली. आजही सेनेने काही निर्णय घेतला नाही तर ‘तेल गेले तूप गेले आणि हाती धोपटाने आले !!’ अशीच सेनेची अवस्था होणार आहे हे मात्र नक्की….


शिवसेनेला सरकारमध्ये यायचे असेल तर त्यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत.

१. भाजप बरोबर पुन्हा एकदा मान खाली घालून सत्तेत जाणे किंवा

२. काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत संगनमत करून सरकारमध्ये सामील होणे.

याशिवाय भाजपसमोरही केवळ दोन पर्याय उरलेले आहेत.

१. शिवसेनेची मनधरणी करून सत्ता स्थापन करणे

२. सरकार बनविण्यास असमर्थता दर्शवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शिफारस करणे.

राज्यपाल काय करू शकतात

तज्ज्ञांच्या मतानुसार केवळ सत्ता स्थापनेस विलंब झाला म्हणून राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात तात्काळ राष्ट्रपतींकडे शिफारस करू शकत नाहीत. कायद्यानुसार ते सरकार बनविण्यास त्यांच्या दहिकारात वेळ देऊ शकतात. पण द्यायचा कि नाही याबाबतचा त्यांचा निर्णय अंतिम असेल.

एक नजर काल दिवसभरात घडलेल्या घडामोडींवर …

  • आजचा दिवस शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीने सुरु झाला. आपल्या भूमिकेवर शिवसेना ठाम राहिली. मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षाचे आणि सत्तेत बरोबरीचा वाटा.
  • त्यानंतर सर्व आमदारांना एका हॉटेल मध्ये नजर कैद करण्यात आले.
  • भाजपच्या शिष्ट मंडळाने ठरल्याप्रमाणे राज्यपालांची भेट घेतली खरी पण या भेटीतून काहीही निष्पन्न झाले नाही. सत्तास्थापनेच्या विलंबाबाबत त्यांनी राज्यपालांशी  चर्चाकेली. आणि त्यांना १८२ आमदारांचा पाठिंबा असल्याचे संकेत दिले.
  • सायंकाळी  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बहुमत असलेल्या पक्षाला निमंत्रण द्यावे असे मत मांडून संविधानात्मक पेच प्रसंगावर चर्चा केली आणि पत्रकारांशी बोलताना सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले.
  • राज्यपालांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी कायदेविषयक मुद्यांवर चर्चा केली.
  • दरम्यान सायंकाळी आणि दिवसभर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे आमदार फोडण्याचा भाजपवर आरोप केला.
  • राज्यापालावर भाजपचा दबाव असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला.
  • मुंबई: काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक; मुंबईला तातडीने पोहचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • दिवसभर भाजप नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला अजूनही तो चालूच आहे.
  • ज्यांचे आमदार अधिक मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच राहील म्हणजे भाजपकडेच मुख्यमंत्रीपद असेल आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील अशी भूमिका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी घेतली आहे.
  • दरम्यान काल नागपुरात नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची बंद दाराआड चर्चा झाली.
  • तिकडे दिल्लीतही भाजपचे प्रमुख नेते आणि संघाचे प्रतिनिधी यांच्यात महाराष्ट्राचे राजकारण आणि अयोध्या -बाबरी प्रकरणात येत असलेला निकाल यावर चर्चा केली.

राज्यातील सरकार न बनण्यास जबाबदार कोण ?

हा राज्यातील ऐरणीवरचा प्रश्न आहे. तार्किक अर्थाने जनमताचा स्पष्ट कौल मिळूनही सरकार न बनविण्यास भाजप आणि शिवसेना हे दोन्हीही पक्ष मुख्यतः जबाबदार आहेत. त्यातही याचे सर्वात मोठे कारण शिवसेना आहे .

त्याचा खुलासा असा आहे कि ,  गेल्या पाच वर्षांपासून भाजपकडून मिळालेल्या अवमानास्पद वागणुकीमुळे शिवसेना भाजपवर नाराज आहे . नाराजीच्या वातावरणातच सेनेने भाजपशी आणि भाजपने शिवसेनेशी बळजबरीची महायुती केली आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रासमोर आहेत .

मुळात युती  विधानसभेत युती असतानाही या दोन्हीही पक्षांच्या नेतृत्वाने आपापल्या पक्षातील बंडखोरांना अभय दिले आणि एकमेकांच्या उमेदवारांना कुठे प्रत्यक्ष तर कुठे अप्रत्यक्ष पडण्याचा प्रयत्न केला तरीही केवळ नाईलाज म्हणून हे पक्ष युतीमध्ये एकत्र आले . निवडणुकीच्या निकालात भाजपला वाटत होते कि आपले १५० च्या आसपास उमेदवार निवडून येतील आणि आपल्याला सेनेच्या मदतीची गरज पडणार नाही तर शिवसेनेला वाटत होते कि आपले १०० च्या आसपास उमेदवार निवडून येतील आणि आपला मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर होईल पण निकाल आले ते वेगळेच. या निकालानुसार भाजप आणि सेनेला पाडापाडीच्या धोरणात २०१४ इतक्याही जागा मिळाल्या नाही त्यामुळे दोन्हीही पक्षांची स्वप्ने धुळीस मिळाली. त्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर फारसा आनंद नव्हता. त्यामुळे दोघांनी परस्परांना विजयाची मिठी मारली नाही किंवा दोघांनी दिवाळीच्या शुभेच्छाही एकमेकांना दिल्या नाही आणि विसंवादाला इथूनच खरी सुरुवात आली. भाजपमुळे आपल्याला हव्या तितक्या जागा मिळाल्या नाही म्हणून शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे अस्वस्थ होते म्हणून दिवाळीतही ते अपक्षांना आपल्यासोबत जोडण्याच्या कार्यात मग्न होते . आ. बच्चू कडू यांनी गावाकडे दिवाळी न करता मात्रोश्रीवर उद्धव ठाकरे त्यांना भेटून आपली दिवाळी साजरी केली.

दुसरीकडे ऐन दिवाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पुढे काय होईल याची चिंता न करता पत्रकारांना फराळाला बोलवून आपल्या १०५ आमदारांच्या बळावर शिवसेना सहज आपल्यासोबत येईल असे गृहीत धरून नेहमीच्या थाटात ठोकून दिले कि , आपण मुख्यमंत्री बनणार असून भाजपच्याच नेतृत्वात सरकार बनेल. त्यावर २४ तारखेला निकाल लागल्यापासून शिवसेनेचे नेते बोलत होते , भाजपला आठवण करून देत होते आता जे काही होईल ते भाजपने आम्हाला लेखी द्यावे , लोकसभेच्या वेळी ठरले होते सत्तेत सेनेला ५०-५० टाके वाट देण्यात येईल यात मुख्यमंत्रीपदाचासुद्धा समावेश असेल. याकडे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता , अर्थात हा प्रश्न विचारला जाईल याची देवेंद्र फडणवीस यांना कल्पना असावी म्हणून ते म्हणले कि , मी आताच अमित शहा यांना फोन करून विचारले कि , मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत शिवसेनेबरोबर काही ठरले आहे का ? त्यावर त्यांनी सांगितले कि , मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत असे काहीही ठरलेले नाही.

आणि हि बातमी शिवसेनेच्या कानावर जाताच शिवसेनेत हाहाकार मजला तो कालपर्यंत कायम आहे . काल सायंकाळ पर्यंत आता मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणार असाल तरच फोन करा किंवा भरतयाला या असे उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हानच भाजपला देऊन टाकले.

दरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या त्या आपल्यासमोर आहेत. आता यामध्ये सर्वाधिक जबाबदारी शिवसेनेची आहे . म्हणजे आजच्या परिस्थितीला जबाबदार फक्त शिवसेना आहे . त्याचे करणं असे आहे कि, गेल्या १४ दिवसांपासून सेनेची एकाच मागणी आहे आणि भाजप त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ज्या पक्षाकडे केवळ ५६ आमदार आहेत त्या पक्षाला भाजप कधीही मुख्यमंत्री देण्यास तयार होणार नाही हे स्पष्ट आहे तरीही शिवसेना या दिवा स्वप्नात आहे कि , भाजप त्यांच्या या मागणीचा विचार करील. जेंव्हा कि , हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट होते कि , कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भाजपकडून मुख्यमंत्रीपद मिळणार नाही तेंव्हा शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवीसाठी विचार करायला हवा होता.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी वारंवार भाजपचा मुख्यमंत्री बानू नये म्हणून शिवसेनेला सहज काही अति -शर्तीवर पाठिंबा देण्यास तयार होते परंतु भाजप आपल्यासमोर लोटांगण घेईल या आशेवर आपल्या मागणीवर ठाम राहिले पण भाजप -भाजप आहे ती सेनेकडे येणार नाही हे उघड आहे . इतर राज्यात ते कसे वागले आणि कुठल्या युक्त्या -क्लुप्त्या वापरून त्यांनी सरकारे बनविली याचे वर्तमान समोर असतानाही शिवसेना भ्रमात राहिली हेच खरे आहे. उद्या अखेरच्या दिवशी जरी शिवसेना जर या पर्यायावर आली तरी आता औट घटकेला काँग्रेसचा पाठिंबा त्यांना मिळेल याची खात्री देता येत नाही. कारण यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. सोनिया गांधींच्या भेटीच्या आधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना जरी पाठिंब्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला असता तरी पवारांनी स्वतःच्या हिंमतीवर सोनिया गांधी यांचा होकार मिळवला असता पण इथेही शिवसेना चुकली.

या सर्व सत्ता स्थापनेच्या महाभारतात आज जर भाजपसोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला नाही तर शिवसेनेची अवस्था अर्थातच तेल गेले तूप गेले आणि हाती धोपटाने आले अशीच होणार आहे यात वाद नाही. बाकी काहीही असो योग्य निर्णय घेण्याचा शहाणपणा सेनेला आज तरी सुचेल का ? हा प्रश्न आहे.

  • बाबा गाडे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!