Maharashtra Politics : सत्ता स्थापनेच्या पेच प्रसंगात प्रकाश आंबेडकरांनी काय दिला सल्ला ?

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा निर्माण झालेला पेच लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली. राज्यपालांना भेटून आल्यावर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाचा वाद सुरू असल्याने भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना-भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने स्वत: पुढाकार घेऊन राज्यात सरकार स्थापन करावं, किंवा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये म्हणून भाजप -शिवसेनेने ठराविक मंत्र्यांना शपथ देऊन सरकार स्थापन करावे.

Advertisements

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी हा सल्ला दिला. काँग्रेसने पुढाकार घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करावा. बहुमताचा प्रश्न आता महत्त्वाचा नाही. सभागृह चालवण्याची जबाबदारी सरकारची असते. तसं झालं नाही तर सरकार कोसळेल. त्यामुळे नव्या सरकारसोबत जायचं की नव्याने निवडणुका घ्यायच्या हे सदस्यांनाच ठरवायचं आहे, असं ते म्हणाले.

Advertisements
Advertisements

प्रकाश आंबेडकर यांच्या मतानुसार ज्या दिवशी शपथविधी होतो तो दिवस विधिमंडळाचा पहिला दिवस मानला जातो. त्यामुळे त्यांनी  राज्यपालांशी चर्चा केली. मागीलवेळी ८ नोव्हेंबरला शपथविधी झाला होता. तो कार्यकाळ उद्या संपत आहे. त्यामुळे आज रात्री किमान सरकार स्थापन झालं पाहिजे. अन्यथा निवडून आलेल्या ४ ते ५ विधिमंडळ सदस्यांचा शपथविधी तरी घ्यावा लागेल. त्यानंतरच सभागृह गठित झालं असं म्हणता येईन. या दोन्ही गोष्टी होणार नसतील, तर ३५६ कलमानुसार राष्ट्रपती शासन लागू करावे लागेल. त्याला पर्याय राहणार नाही, असं आंबेडकरांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं.

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १७२नुसार विधिमंडळ सुरूच असतं. मात्र, हे विधिमंडळ सुरू राहण्यासाठी दर ५ वर्षांनी निवडणूक होते आणि सदस्य निवडले जातात. विधिमंडळाचं काम सुरू राहावं म्हणून निवडणुका होतात. त्यामुळे आधीच्या आमदारांच्या शेवटच्या दिवशीच नव्या आमदारांचा शपथविधी झाला, तरच विधिमंडळ सुरू राहिल. अन्यथा राष्ट्रपती शासन लागू करावं लागणार आहे. असे  होऊ नये म्हणून राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे  सांगतानाच आंबेडकरांनी यावेळी ज. वि. पवार यांच्या याचिकेचाही संदर्भ दिला. २०१४ मध्ये ज. वि. पवार यांनी एक दिवस उशिराने शपथविधी होत असल्याने याचिका दाखल केली होती. त्यानंतर शिवाजी पार्कवर दोन सदस्य आणि प्रोटीम स्पिकर यांचा शपथविधी झाला, याकडेही त्यांनी राज्यपालांचं लक्ष वेधले.

वंचित बहुजन आघाडीकडे वळलेल्या मतदारांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, आमचे कार्यकर्ते आमच्याशी प्रामाणिक आहेत. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते वंचितबरोबरच राहतील. वंचितला सोडून जाणार नाहीत.

आपलं सरकार