Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : संजय राऊत -पवारांच्या दुसऱ्या भेटीतही त्याच चर्चा , काँग्रेसच्या भूमिकेविषयी साशंकता

Spread the love

राज्यातील  सत्तास्थापनेचा पेच सुरू असताना  शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची त्यांचे मुंबईतील निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट घेतली. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात १०-१५  मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत राज्यातील राजकीय स्थितीवर आमची चर्चा नक्कीच झाल्याचे संजय राऊत यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

आपल्या या भेटीमध्ये राज्यातील राजकीय पेचप्रसंगाबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे असे पवार म्हणाल्याचे राऊत म्हणाले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका शरद पवार हे सांगतील, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षात बसावे असे जनमत असल्याचे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील चर्चा ठप्प झाल्यानंतर, तसेच शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहभागाने आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करेल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आपल्याला शिवसेनेने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, प्रस्ताव आल्यास विचार करू असे वक्तव्य करत शरद पवार यांनी या चर्चेची धग कायम राखली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शिवसेनेने ठरवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत राज्यात सरकार स्थापन करू शकेल असे म्हणत या चर्चेच्या निखाऱ्यावर फुंकर घातली.

आज सकाळी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील मात्र कळू शकला नाही. त्यानंतर काही वेळातच राऊत यांनी पवार याची भेट घेत राज्यातील चर्चा अधिक रंगतदार होत आहे. भारतीय जनता पक्षाशी जमले नाहीच, तर राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी व्हावे, असा प्रस्ताव देण्यासाठी संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला गेले का, या प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

दरम्यान शिवसेना- राष्ट्रवादी यांच्या सत्तेचे समीकरण जुळणार काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून आहे. या मुळे काँग्रेस या नव्या समीकरणाला पाठिंबा देणार का ? हे जाणून घेण्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!