Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात जोरदार पाऊस

Spread the love

उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात  ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं पावसामुळं पिकांचे नुकसान झाल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, पुण्यासह औरंगाबाद आणि अन्य भागांत आज संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोयाबीनसह तूर, हरभरा, ज्वारी, कापूस या रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. डाळींब, पपई, या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पिकांच्या नुकसानीमुळं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळं बुधवारपासून (६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत) उत्तर कोकणसह उत्तर मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

अरबी समुद्रात महा चक्रीवादळ आलं आहे. समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे. त्यामुळं मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचनाही सरकारनं दिल्या आहेत. तसंच योग्य त्या उपाययोजनांसह सज्ज राहण्याच्या सूचना संबंधित विभागातील सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मदतीसाठी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान  पुणे आणि औरंगाबादमध्ये आज संध्याकाळी जोरदार पाऊस पडला. पुण्यातील कात्रज, बिबवेवाडी, वानवडी, धनकवडी, सहकार नगर भागात मुसळधार पाऊस कोसळला. सासवड आणि पुरंदर भागातही पाऊस सुरू आहे. तर औरंगाबादमधील काही भागांतही पावसानं हजेरी लावली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!