Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अयोध्या -बाबरी मशीद प्रकरण : निकालाच्या दरम्यान बंदोबस्ताची मुस्लिम समुदायाची मागणी , योगी सरकारचा कोणतेही भाष्य न करण्याचा मंत्र्यांना इशारा

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचा अंतिम निर्णय येण्याआधी अयोध्येत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाप्रकरणावरच्या फैसल्याआधी मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे केंद्रीय अर्थ सैनिक दल (पॅरामिलिट्री फोर्स) तैनात करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अयोध्येत ज्या भागात मुस्लिमांची संख्या बऱ्यापैकी आहे त्या भागात सुरक्षा तैनात करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या फैजाबादमध्ये  प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाने ही मागणी केली आहे. जमियत उलेमा हिंदच्या अयोध्या विंगच्या जनरल सेक्रेटरी हाफीज इरफान यांनी ही मागणी केली आहे. ते म्हणाले, आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर परिसरात शांतता व सद्भावना कायम राहिल अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु, जर निकाला आधी मुस्लिम बहुल भागात केंद्रीय अर्ध सैनिक दल तैनात केले तर आम्हाला अधिक सुरक्षित वाटेल, असे त्यांनी म्हटले आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. तसेच या महिन्यात यासंबंधीचा निर्णय येण्याची शक्यता आहे.

दरम्यान फैजाबादच्या पोलीस अधीक्षकांनी मुस्लिम समाजाला पुरेसी सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचा विश्वास दिला आहे. मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या भागात आधीपासूनच पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहरी पोलिसांसोबत सीआरपीएफ दल तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक आशीष तिवारी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली आहे. तर फैजाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजाला अयोध्येत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांना या प्रकरणी कोणतेही भाष्य करू नका असे आवाहन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्र्यांने कोणतेही वक्तव्य करू नये, असे योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेट बैठकीत सांगितले. कोणताही वाद निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य मंत्र्यांने करण्याचे टाळावे, असे योगी यावेळी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!