अभिव्यक्ती : भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेनेच्याच “बाणा”त , प्रश्न आहे तो सोनिया गांधी आपल्या हातात “धनुष्य बाण ” घेतील ?

Spread the love


राष्ट्रवादीकडे  महाराष्ट्रातील जनता धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने यासाठी पाहत नाही कि , त्यांनी २०१४ लाच भाजपसोबत जाण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. दरम्यानच्या काळात पवारांच्या गळ्यात ईडी चे बालंट येई पर्यंत पवार आणि मोदी मांडीला मंडी लावून बसणारे तसे मित्रच होते.  पण काँग्रेसला महाराष्ट्रातील मतदार त्यांच्यापेक्षा वेगळे पाहतात म्हणून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा न देण्याची शक्यता अधिक आहे. आणि जर पवारांच्या मनाप्रमाणे काँग्रेस वागली तर मग जनतेच्या मनातून काँग्रेस उतरून जाईल हे मात्र नक्की.


सध्या कुठलेच महत्वाचे न्यूज अपडेट नाही. सायंकाळचे महत्वाचे वृत्त इतकेच आहे कि , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांच्याशी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी १० जनपथला गेले आहेत. आज किंवा उद्या त्यांची सोनिया गांधी यांच्याशी भेट होऊ शकेल. अर्थात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा हा त्यांच्या एकूण चर्चेचा सूर राहील असे सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने ते हा किल्ला लढविणार आहेत. दरम्यान इकडे महाराष्ट्रात काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याआधीच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी त्यांच्याकडे १७० ते १७५ आमदारांचे समर्थन आहे असे सकाळीच जाहीर केले आहे. मग काँग्रेसच्या पाठिंब्याची गरजच काय ? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.

महायुती म्हणून निवडणूका लढविलेल्या भाजप- शिवसेनेला महाराष्ट्राचे सरकार बनविण्याचा स्पष्ट कौल मिळालेला असला तरी कुठल्याही शर्थीवर  महाराष्ट्राचे अर्धे अर्धे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत ५०-५० टक्केचा फॉर्म्युला अंमलात आणल्याशिवाय सत्तेच्या बाहुल्यावर न चढण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे . कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना तसे वचन दिले आहे कि , एक दिवस मी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन आणि महाराष्ट्राच्या विधानभवनावर शिवसेनेचा भगवा फडकवेन. हि झाली उद्धव ठाकरे यांची प्रतिज्ञा. त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातील शिवसैनिकांना शब्द दिलेले  आणखी एक नेते  शिवसेनेत आहेत. खा . संजय राऊत . त्यांनी शिवसेनेच्या दसरा  मेळाव्यात शब्द दिलाय कि , आगामी दसरा मेळाव्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री उपस्थित राहील. त्यासाठी हा संघर्ष चालू आहे. यालाच म्हणतात प्राण जाय , पर वचन ना जाय… मग त्यासाठी आपल्या पक्षाला जागा कितीही मिळोत. ठरलंय . म्हणजे ठरलंय.

अर्थात या सर्व परिस्थितीला भाजप स्वतः कारणीभूत आहे. सत्तेच्या मस्तीत त्यांनी शिवसेनेला आपल्या वचनावर आणून ठेवले आहे. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार भाजपचे नेते अमित शहा यांनी लोकसभेच्या वेळी त्यांना शब्द दिलाय . ५०-५०. म्हणजे आमचं ठरलंय . आता ५०-५० टक्के म्हणजे मुख्यमंत्री पदासहित ५०-५० टक्के असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु त्यांच्या या ” ठरलंय ” ला भाजपच्या अमित शहा यांनी नेमकं काय ठरलंय ? आणि उद्धव ठाकरे म्हणतात तसं काही ठरलंय का ? याचे उत्तर अद्याप देत नाहीत . शेजारच्या हरयाणापर्यंत ते येतात , सरकार स्थापन करून निघून जतात पण ना महाराष्ट्रात येतात ना महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलतात . शेवटी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी , भाऊबीजच्या आनंदात मुख्यमंत्री पत्रकारांना वर्ष बंगल्यावर फराळासाठी बोलावतात , गप्पा टप्पा मारतात आणि याच गप्पांच्या ओघात सांगून टाकतात . मी अमित शहा त्यांना आताच फोनवर बोललो , आणि विचारले कि , मुख्यमंत्री पदाचं ५०-५० असं काही ठरलय  का ? त्यावर त्यांनी सांगितले कि “तसं काहीही ठरलं नाही.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या समोर हा फटाका  फोडताच  तिकडे मातोश्रीवरून आणि “सामना”मधून फटाक्यांची आतषबाजीत सुरु झाली आणि ५०-५० असं काही ठरेलंच नसेल तर मग या विषयावर चर्चाच कशाला म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाजप -सेनेची त्या दिवशी दुपारनंतर होणारी बैठकच मोडून टाकली. उद्धव ठाकरे यांच्या मतानुसार त्यांना मुख्यमंत्र्यांचे हे निवेदन जिव्हारी लागणारे होते. तेंव्हापासून भाजप सेनेची हि चर्चा फिसकटली ती फिस्कटलीच.

दरम्यान या सर्व चर्चेमध्ये आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चांगलाच ट्विस्ट आणला आहे. सत्ता निर्मितीची सूत्रे त्यांनी आता हातात घेतली आहेत. खरे तर त्यांनी यावेळी प्रारंभीच आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले होते कि , ज्यांना सरकार स्थापन करण्याचा जनादेश मिळाला आहे त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावे आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मात्र शिवसेनेची भाजपला सोडून सरकार स्थापन करण्याची इच्छा असेल तर आमच्याकडे प्रस्ताव द्यावा म्हणजे आम्ही तो अंतिम मंजुरीसाठी हाय कमांडकडे पाठविण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु शिवसेनेने त्यांची दखल घेतली नाही. कारण भाजप आपल्या दबावाखाली राहील असे वाटत होते परंतु झाले भलतेच. स्वतः पवारही भाजप -सेनेतील विस्तव पाहून अचंबित झाले, त्यांनी मग शांतपणे विचार केला आणि संजय राऊत आणि त्यांच्यात दिवाळी भेट झाली . तेंव्हा पवारांना खात्री झाली कि , आपण नवे सरकार बनविण्यासाठी आपले योगदान देऊ शकतो. आणि मग ते “स्टार्ट” झाले.

राज्याच्या विधानसभेचे निकाल लागून १२ दिवस झाले आणि भाजप -सेनेचा वाद सुरु होऊन पाच -सहा दिवस लोटले पण ना भाजप -सेनेत समझौता झाला ना शिवसेनेकडे सरकार बनविण्याइतपत बहुमताची व्यवस्था झाली. शिवसेनेकडे त्यांना मिळालेले अपक्ष आणि राष्ट्वादीचे आमदार आहेत पण आता जे थांबले आहे ते काँग्रेसमुळे थांबलेले आहे. ज्यांना आधी शिवसेनेने नजरअंदाज केले. दरम्यान काँग्रेसचे चार नेते दिल्लीला गेले . सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या पाठिंब्याचा विषय काढला परंतु सोनियांनी त्यांना “नाही ” म्हणून रिकाम्या हाताने परत  पाठवले. अर्थात या विषयावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद आहेत.

आता सोनिया गांधी यांचे शिवसेनेसाठी मन वळविण्याचा निर्धार करून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दिल्लीला गेलेले आहेत. आता उद्या ५ किंवा ६  नोव्हेम्बरपर्यंत निर्णय झाला तर शिवसेनेने ठरविल्याप्रमाणे शिवतीर्थावर मुख्यमंत्र्यांचा शपथ विधी होईल अन्यथा भाजपने ठरविल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होईल. पण आता किंगमेकर शिवसेना किंवा राष्ट्रवादी नाही तर काँग्रेसच्या सोनिया गांधी आहेत हेच खरे आहे . पण शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याइतके हे सोपे नाही. कारण भाजपचा नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला पवार म्हणतात म्हणून पाठिंबा देणे काँग्रेसला भविष्याचा विचार करता परवडणारे आहे का ? हा खा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादीच्या दृष्टीने राजकारणात शत्रू मित्र नसेलही पण धर्मनिरपेक्षतेचे कायम राजकारण करणारी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल का ? हा खरा प्रश्न आहे.

  • बाबा गाडे , संस्थापक संपादक , महानायक ऑनलाईन.

 

 

आपलं सरकार