Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादाची सुनावणी पूर्ण , संघ , पवारांपाठोपाठ मुस्लिम नेत्यांचीही शांततेचे आवाहन

Spread the love

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पूर्ण झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीदिनापर्यंत म्हणजे १७ नोव्हेंबपर्यंत न्यायालय या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता आहे, तत्पूर्वी हिंदू व मुस्लीम समाजातील धार्मिक नेते व संघटनांकडून निकाल काहीही लागो शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , नंतर शरद पवार आणि आता मुस्लिम धर्मगुरू शाही इमाम खालिद रशीद फिरंगी महाली यांनी मुस्लिमांना शांततेचे आवाहन केले आहे. आज उत्तर प्रदेशमधील मुस्लिम धर्मगुरूंनी शुक्रवारच्या नमाजच्या अगोदर मशिदींमध्ये निकालाच्या पार्श्वभूमीवर शांततेचे आवाहन केले. समाजातील लोकांना कोणत्याही परिस्थितीत जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लखनऊमध्ये शाही इमाम खालिद रशीद फिरंगी महाली यांच्या नेतृत्वात हे आवाहन करण्यात आले आहे. ते इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य आहेत.

खालिद रशीद फिरंगी महाली  यांनी म्हटले आहे कि , सर्वोच्च न्यायालयचा जो काही निकाल असेल त्याचा आदर असला पाहिजे. त्या ठिकाणी जल्लोष किंवा नागरिकांकडून विरोध होऊ नये. एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य देखील व्हायला नको. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांतता कायम राखणे आवश्यक आहे, असे रशीद यांनी लखनऊ येथे जवळपास ५०० नागरिकांच्या समुहास संबोधित करताना सांगितले आहे. तसेच. जातीय सलोखा व गंगा-जमुनी तहजीबच्या धाग्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

शरद पवार यांचेही आवाहन 

अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांनी मान्य करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अयोध्या खटल्यावर शरद पवार यांनी नवनिर्वाचित आमदारांना काही सूचना केल्या. या खटल्यावरील निकालानंतर देशात कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते. काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदारसंघात शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि संयम राखण्यासाठी प्रयत्नशील रहावे. या निकालाचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्वे समाजात अशांतता निर्माण करणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

अवघ्या देशाचे लक्ष अयोध्या खटल्याच्या निकालाकडे लागले आहे, असे नमूद करताना सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल, तो सर्वांनी मान्य करायला हवा. न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनीच आदर करायला हवा, असेही पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही ट्विट 

आगामी काही दिवसांत अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांनी खुल्या मनाने स्वीकार करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. यासंदर्भातील एक ट्विट रा.स्व.संघाने केले असून, या निकालानंतर देशात सौहार्दपूर्ण वातावरण राहील, ही सर्वांची जबाबदारी आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी वादावरील निकालाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भैयाजी जोशी उपस्थित होते.

भारताच्या इतिहासातील सर्वांत संवेदनशील आणि वादग्रस्त ठरलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद जमीन खटल्याची सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला. सरन्यायाधीश गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, त्यापूर्वी निकाल अपेक्षित आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!