अभिव्यक्ती : “शिवसेनाकी मजबुरी है , देवेंद्र फडणवीस जरुरी है !! ” हेच महाराष्ट्राचे विधान आहे, सेनेसमोर दुसरा पर्याय नाही….

Spread the love


भाजप बरोबर समझौता करून सत्ता स्थापन करण्यावाचून अन्य कुठलाही पर्याय शिवसेनेसमोर नाही . त्यामुळे “शिवसेनाकी मजबुरी है , देवेंद्र फडणवीस जरुरी है !! ” हेच महाराष्ट्राचे आजचे विधान आहे. या विधानात जर काँग्रेस -राष्ट्रवादीने  बदल करण्याचा अतिप्रसंग केला तर हे दोन्हीही पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून निष्प्रभ होतील यात  कुठलीही शंका नाही. :  बाबा गाडे 


महाराष्ट्रातील राजकारणचा  राज्यातील सुमार बुद्धीच्या नेत्यांनी निव्वळ तमाशा केला आहे. एक ना धड भराभर चिंध्या अशी विद्यमान राजकारणाची अवस्था आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीच्या भ्रष्ट राजकारण्यांमुळे भाजपसारखा अडेलतट्टू आणि हेकेखोर बहुतांश अडाणी नेत्यांचा पक्ष भारताच्या मानगुटीवर बसला. मुळात या सत्तापरिवर्तनामध्ये  भाजपचा विजय कमी आणि काँग्रेससह तमाम पक्ष -संघटनांचा पराभव अधिक महत्वाचा आहे. २०१४ च्या निवडणुकीत दिवसेंदिवस दुबळ्या होत जाणाऱ्या काँग्रेस पक्षाला आणि भ्रष्टाचारामुळे सुजत चाललेल्या नेत्यांना देशातील मतदारांनी खड्यासारखे बाजूला फेकले त्याचा परिणाम म्हणून भाजप आपोआप निवडून आला . जसे आयोडेक्स मलिये  और काम पे चलीये…तसे हे आले !!

२०१९ मध्येही दुबळ्या आणि शक्तिहीन, गलितगात्र  झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनि  आणि विरोधी पक्षांनी स्वतंत्र लढून भाजपाला शक्ती दिली आणि स्वतःचे तोंड स्वतःच फोडून घेतले. तर काहींनी स्वतःची शोभा करून घेतली. लोकसभेच्या अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लागल्या आणि २०१४ मध्ये काँग्रेस -राष्ट्रवादीचे जसे पानदान वाजले होते तसेच यावेळी २०१९ मध्ये भाजप -सेनेचे वाजले. गेल्या पाच वर्षात सेनेची जी भूमिका आणि अवस्था होती तशीच अवस्था २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची होती. ज्या प्रमाणे सत्तेची फळे चाखून कोयी आणि टरफले सेनेने भाजपच्या अंगणात टाकली तशीच ती राष्ट्रवादीने काँग्रेसच्या अंगणात टाकली होती. इतकेच नव्हे तर काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या विरोधी पक्षांनीच २०१४ मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांची रेवडी उडविण्याचे काम केले होते. स्वतःला राष्ट्रीय नेते  आणि साळसूद म्हणवून घेणारे लोक या सर्व गोष्टी किती लवकर विसरतात नाही ? 

व्यक्तिगत भ्रष्टाचारात अखंड बुडालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुळात पक्ष म्हणून काँग्रेसकडे लक्षच दिले नाही . त्यामुळे गावपातळीवर काँग्रेस तोळा-मासा झाला. याच नेत्यांच्या धोरणामुळे तर काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे टायटॅनिक झाल्यानंतर काँग्रेसच्या बग्गी मध्ये बसून जे जे नाकर्ते  लोक मोठे झाले तेच लोक काँग्रेसचे बुडते जहाज सोडून पळाले. आज तर अनेकांना आपण कधी काळी काँग्रेसची मलई खात होतो , काँग्रेसमध्ये मंत्री होतो याची आठवणसुद्धा राहिलेली नाही. अर्थात काँग्रेसच्या पडत्या काळात जे महाराष्ट्रातील नेते काँग्रेसबरोबर नॉष्ठेने आहेत त्यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ टाकली आहे मग ते अशोक चव्हाण असोत कि नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले बाळासाहेब थोरात असोत.

अशा परिस्थितीत २०१४ मध्ये उदयास आलेल्या भाजपाला भारतीय राजकारणाचे लोणी इतक्या लवकर लागेल असे कोणालाही वाटले नव्हते. ज्या भाजपाकडे संघाच्या शाखेवरील चार दोन लोक आणि कधी तरी दिसणारे कार्यकर्ते , नेते होते त्या पक्षाचे आज प्रत्येक बुथवर आज किमान १०० कार्यकर्ते आहेत. पक्ष किंवा संघटनात्म बांधणी कशाला म्हणतात हे संघाकडून शिकण्यासारखे आहे. पण २०१९ उजाडता उजाडता भाजपची काँग्रेस होऊन जाईल याची कल्पना मोहन भागवत किंवा त्यांच्या संघाने कधीही केली नसेल. बुथवरील १०० पैकी ९० कार्यकतें हे इतर पक्ष संघटनांमधून भाजपकडे काही तरी पदरात पाडून घ्यावे या आशेपोटी आलेले आहेत . महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तर या पक्षांतराचा मोठा विक्रमच झाला. आता मूळचे  संघी कोण ? भाजपचे कोण ? काँग्रेसचे कोण आणि राष्ट्रवादीचे कोण ? हे ओळखणे कठीण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे  संघाच्या हातातून निसटून मोदी आणि शहा यांच्या हातात गेलेली भाजपची कमांड . कारण भाजप आज संघाचा नव्हे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पक्ष झाला आहे. पण काहीही असो आपल्या कुंकवाचा टिळा त्यांच्या कपाळी आहे याचेच संघाला भूषण आहे. 

महाराष्ट्रात २०१९ ला जनमताचा  कौल विद्यमान भाजप -सेनेच्या विरोधात होता हे तेंव्हाच स्पष्ट झाले होते जेंव्हा मोदी आणि शहांच्या सभा फेल झाल्या. महाराष्ट्रातील राजकीय  नेत्यांच्या आडमुठ्या आणि महत्वाकांक्षी धोरणामुळे भाजप विरोधी मते मोठ्या प्रमाणात विखुरली आणि पुन्हा एकदा भाजप -शिवसेना महायुतीला मताधिक्य मिळाले. परंतु भाजपने गेल्या पाच वर्षात शिवसेनेला गड्यासारखी वागणूक दिल्यामुळे शिवसेनेतील गडी आता जागा झाला आहे. त्याचे कारण स्वबळावर १५० च्या आसपास जागा मिळतील हा भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. त्यामुळे त्याच  भोपळ्याची मोट करून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवायचीच  अशी स्वप्ने शिवसेना नेते पाहत आहेत. त्याचे कारण शिवसेनेला मिळलेल्या ५६ जागांमुळे शिवसेनेची छाती मोदींच्या छातीसारखी ५६ इंची झाली आणि त्यांनी नारा दिला कि , “मुख्यमंत्री बनेगा तो हमाराही  बनेगा…”

विधानसभेचे निकाल लागून ९-१० दिवस उलटून गेले असले तरी १०५ आमदार मिळविणाऱ्या भाजपला सरकार बनविणे अवघड झाले आहे. मुळात भाजप -सेनेला मिळून बहुमत असल्याने त्यांचे सरकार बनून त्यांनी कारभार पाहायला सुरु करणे गरजेचे होते परंतु या दोन्हीही पक्षांकडे नीती आणि मुख्य म्हणजे नियतीचा अभाव असल्याने लोकांनी वाढून दिलेले असतानाही त्यांना खाता येईना अशी त्यांची अवस्था आहे तर राष्ट्रवादीचे थोर नेते शरद पवार त्यांना पोरखेळ थांबवण्याचा सल्ला देऊन दोन कोंबड्यांची झुंज पाहत आहेत. 

२०१४ मधील हेच ते शरद आहेत आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे  ज्यांनी निकालाच्या पहिल्याच दिवशी भाजपला बिनशर्त पाथमिबा देण्याची एकतर्फी घोषणा केली होती परंतु संगोत्रामुळे भाजपने साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी उरकल्यामुळे राष्ट्रवादीचे भाजपवरील प्रेम एकतर्फीच राहिले . याच प्रेमाचा ओलावा मनात ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीला चक्कर मारली होती. अगदी २०१९ येईपर्यंत घटस्फोटाचे कागद खिशात ठेवूनही आपण भाजपला घटस्फोट दिल्यास राष्ट्रवादी आयत्या घरात घुसेल आणि आपला संसार मोडेल या भीतीपोटीच एखाद्या सासुरवाशिणीप्रमाणे घरेलू हिंसाचार , पावलोपावली होणार अवमान सहन करून सेनेने कसे तरी पाच वर्षे काढले. आज ज्या पद्धतीने निकाल आले आहेत त्यावरून सेनेला वाटते कि , बदला घेण्याची वेळ आलेली आहे पण कोणाच्या भरवशावर ? 

ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षातील भाजप -सेनेच्या संसारावर पळत ठेवली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरवशावर ? आणि हा भरवसा किती रिलायबल आणि ट्रस्टवर्थी आहे ? याचा विचार सेने करू शकत नाही कारण द्रौपदीची जसा अर्जुनाला फक्त माश्याचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे आज शिवसेनेला फक्त मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिसत आहे . ज्या खुर्चीवर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आधीच रुमाल टाकून ठेवला आहे. मग कुठल्या पर्यायाची भाषा शिवसेना करीत आहे. ?  

२०१९ च्या सत्ता स्थापनेत काँग्रेस -राष्ट्रवादी आपल्याला मदत करतील अशी आशा शिवसेनेला असेल तर हे कधीही शक्य नाही. एखाद्यावेळेस भाजपशी अलीकडच्या काळात झालेली दुश्मनी म्हणून राष्ट्रवादी आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांना भापजच्या विरोधात खो देतीलही पण काँग्रेसचे नेतृत्व कुठल्याही परिस्थितीत  हिंदुत्ववादाच्या शिजविलेल्या अन्नावर पोसलेल्या भाजपसारख्याच शिवसेनेसारख्या पक्षाला कधीही मदत करणार नाही हेच आजच्या काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. 

काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे , संजय निरुपम आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खारगे यांनी पक्ष श्रेष्टींच्या मनातील भावनाच बोलून दाखविली आहे . त्यामुळे आणखी कुठले पर्याय शिवसेनेसमोर आहेत त्यांचे तेच जाणोत . अशा परिस्थितीत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन काहीही होणार नाही या उलट २०१४ प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र भाजपला आतून किंवा बाहेरून पाठिंबा देऊन महाराष्ट्राची सत्ता स्थापन करू शकते परंतु याचे दूरगामी परिणाम लक्षात घेता यावेळी २०१४ सारखे धाडस राष्ट्रवादी करू शकेल असे वाटत नाही. 

परिणामी पुन्हा एकदा भाजप बरोबर समझौता करून सत्ता स्थापन करण्यावाचून अन्य कुठलाही पर्याय शिवसेनेसमोर नाही . त्यामुळे “शिवसेनाकी मजबुरी है , देवेंद्र फडणवीस जरुरी है !! ” हेच महाराष्ट्राचे आजचे विधान आहे. या विधानात जर काँग्रेस -राष्ट्रवादीने  बदल करण्याचा अतिप्रसंग केला तर हे दोन्हीही पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून निष्प्रभ होतील याद कुठलीही शंका नाही. महाराष्ट्रात ज्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्राप्त झाल्या आहेत त्या भाजप -सेनेच्या विरोधातील शक्ती म्हणून मतदारांनी दिल्या आहेत . अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने आणि त्यातल्या त्यात काँग्रेसने सेनेच्या कच्छपी लागण्यासारखी दुसरी दुर्गती नाही. महाराष्ट्राचे काँग्रेस नेते याचा अन्वयार्थ लक्षात घेतील अशी  सेक्युलर महाराष्ट्राची भावना आहे. 

आपलं सरकार