Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ॲन्टॉप हिल येथे दोन गटांतील हाणामारीच्या घटनेवरून ताब्यात घेतलेल्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू , पोलीस निरीक्षकासह ५ पोलीस निलंबित

Spread the love

ॲन्टॉप हिल येथे दोन गटांतील हाणामारीच्या घटनेवरून ताब्यात घेण्यात आलेल्या एका २६ वर्षीय तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्याने वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याचे निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अन्य तीन हवालदार अशा पाच जणांचा समावेश  असून चौकशीअंती ही कारवाई करण्यात आल्याचे मुंबई पोलीस दलाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. कोठडीतील मृत्यू म्हणून हे प्रकरण हाताळण्यात येणार आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

विजय हृदयनारायण सिंह या २६ वर्षीय तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. विजय सिंह हा एका औषध कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रीप्रेझेंटेटिव्ह) होता. रविवारी रात्री दोन गटांत झालेल्या मारहाणीप्रकरणी विजयला ताब्यात घेण्यात आले होते. ॲन्टॉप हिल येथे रविवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. याबाबतची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. दोन्ही गटातील काही जणांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना विजय सिंह याच्या छातीत दुखू लागले. त्याला तत्काळ सायन रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

विजयला पोलीस ठाण्यात नेले तेव्हा अंकित मिश्रा हा मित्र त्याच्यासोबत होता. त्याच्या म्हणण्यानुसार, पोलीस स्टेशनमध्ये विजयचं म्हणणं ऐकून न घेता त्याला ड्युटीवरील अधिकारी आणि हवालदारांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर विजय वेदनांनी विव्हळत होता. तो पाणी मागत होता. तेही त्याला देण्यात आले नाही. नंतर तो बोलूही शकत नसल्याचे लक्षात येताच ड्युटीवरील अधिकारी बाहेर आले आणि विजयला हॉस्पिटलमध्ये नेण्यास नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानंतर विजयला आम्ही सायन हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

विजयच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार पोलिसांच्या मारहाणीत आणि निष्काळजीपणामुळे विजयचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. कुटुंबीय व नातेवाईकांनी वडाळा टीटी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या देत आज निदर्शने केली. दुसरीकडे वडाळा टी टी पोलिसांनी मात्र नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. विजय सिंहच्या छातीत दुखू लागल्याने त्याला लगेचच सोडण्यात आले. तो निघत असताना पोलीस स्टेशनच्या गेटवरच कोसळला. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे त्याचा मृत्यू झाला, असा वडाळा टी टी पोलिसांचा दावा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!