Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur Crime : राजकीय नेत्यांचे फ्लेक्स लावण्यावरून तरुणावर तलवार आणि चाकूचे वार , भरचौकात झाला तरुणाचा खून

Spread the love

मुख्यमंत्र्यांच्या गावात आणि राज्याच्या उपराजधानीत खुनाचे आणि गुन्हेगारीचे सत्र चालूच आहे . रविवारी रात्री राजकीय नेत्यांचे  फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाले.  नागपूरच्या  उदयनगर परिसरात ही थरारक घटना घडली. यामुळे विधानसभा निवडणुकीनंतरही दक्षिण नागपुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

जितेंद्र वासुदेवराव बडे (२९) रा. संजय गांधीनगर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद दशरथ रोकडे (२५) रा. दुबेनगर व इतरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र हा संजीवनी रुग्णालयातील शल्यक्रियागृहात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. तो अविवाहित असून आई-वडील आणि लहान भावासह राहत होता. पूर्वी तो भाजप युवा मोर्चाच्या महत्त्वाच्या पदावर होता. गेल्या निवडणुकीत त्याने पक्षाचे चांगले कामही केले होते. मात्र, गटाअंतर्गत विरोध असल्यामुळे काहीं जणांमध्ये त्याच्याविषयी गैरसमज झाला होता. त्यामुळे त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला. आरोपी प्रसाद रोकडे आणि त्याच्या सहा साथीदारांनी जितेंद्रवर लक्ष ठेवले. रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास जितू हा मित्र रितीक धनराज डेंगे (२०) रा. भोलेबाबा नगर आणि अभिजित खरात यांच्यासोबत उदयनगर चौकात पानठेल्यावर उभा होता. तेव्हा जितेंद्रने उदयनगर चौकात लागलेले एका राजकीय नेत्याचे पोस्टर फाडले व शिवीगाळ केली. आरोपी प्रसाद रोकडे याला माहिती मिळताच तीन दुचाकींवर सात जण उदयनगर चौकात आले. त्यांनी जितेंद्रला पकडले आणि भरचौकात आणले. त्याच्यावर चाकू आणि तलवारीने सपासप वार केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी प्रसाद रोकडेला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात सुमारे १६ गुन्हे दाखल आहेत.

रस्त्यावर लागलेल्या स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना कैद झाली आहे. आरोपी आणि मृत त्यात दिसत आहेत. त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर भरचौकात नेऊन खून करण्यात आल्याचे दिसून येते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र ताब्यात घेतले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!