Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडूनही सेनेच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचे समर्थन

Spread the love

रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या शिवसेनेच्या मागणीचे  समर्थन केले आहे. शिवसेनेने दिलेल्या अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या प्रस्तावाचा भाजपने गांभीर्याने विचार करायला हवे, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार नाही, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचाच सूर आठवले यांनी लावला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत जो प्रस्ताव भाजपपुढे ठेवला आहे त्याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. हा प्रस्ताव भाजपला मान्य नसेल तर पाच वर्षांसाठी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्यावे तसेच राज्यात दोन-तीन जास्त मंत्रिपदे व केंद्रात जास्तीचं मंत्रिपद सेनेला द्यावं व हा तीढा सोडवावा, असा सल्लाही आठवले यांनी भाजपला दिला आहे.

राज्यातील जनतेने महायुतीला सत्तेसाठी कौल दिला आहे. जे संख्याबळ महायुतीकडे आहे ते पाहता शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळेच भाजपने शिवसेनेच्या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करावा, असेही आठवले यांनी पुढे नमूद केले. शिवसेनेने सत्तेत समसमान वाटा मिळावा, असे स्पष्ट केले आहे. शिवाय त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदही हवं आहे. ते पाहता शिवसेनेचं समाधान होईल असा तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी मी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, असेही आठवले म्हणाले. सत्तास्थापनेबाबत महायुतीने ४-५ दिवसांत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही आठवले यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, महायुतीच्या सत्तेत रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळायला हवं, असे आठवले काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!