Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिव्यक्ती : महाराष्ट्रात आवाज कुणाचा ? भाजपाची झाली मोठी गोची …. काय होऊ शकते आणि काय नाही ?

Spread the love

१. महाराष्ट्रातील राजकीय बलाबल लक्षात घेता भाजप -सेना सहज सरकार बनवू शकते पण सेनेच्या तालावर !! 

२. मागच्या वेळी स्थिर सरकारच्या नावाखाली राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊ केला होता परंतु त्याचे गंभीर परिणाम राष्ट्रवादीला भोगावे लागले होते . त्यामुळे आता यावेळी पाणी इतके वाहून गेले आहे कि राष्ट्रवादी आता  भाजप सोबत जाण्याचा विचारही करू शकणार नाहीत . मात्र राष्ट्रवादीचे आमदार मिळूनही भाजप  सरकार स्थापन करू शकते.

३. काँग्रेसला सोबत घेऊनही भाजप सरकार स्थापन करू शकते पण दोन्हीही  पक्षांकडून हे होणे शक्य नाही. 

४. आणि चौथा उपाय ज्याची चर्चा आहे . शिवसेना -राष्ट्रवादी -काँग्रेस मिळून सरकार स्थापन करू शकतात पण शिवसेनेसमोरचा अंतिम पर्याय असेल. भाजपाला सत्तेपासून रोखण्याचा हा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी करू शकतात कारण सर्वांचा राजकीय शत्रू कॉमन आहे .


महाराष्ट्राचे निकाल समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रात आवाज कुणाचा असा प्रश्न विचारला जात आहे तो यासाठी हा आवाज जनतेने शिवसेनेच्या मुखात आणून ठेवला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील प्रचार सभांच्या दरम्यान म्हणाले तसे केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हे समीकरण आता खरे ठरेल कि नाही ? अशी परिस्थिती निवडणूक निकालानंतर निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्हीही राज्यात हाच प्रश्न निर्माण झाला . तिकडे जेजेपी म्हणेल ती पूर्व दिशा आणि इकडे शिवसेना म्हणेल ती पूर्व दिशा. लोकसभेला ज्या प्रमाणे न भूतो न भविष्य असे यश भाजपला मिळाले अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि हरयाणातील मतदार मोदी मोदी म्हणत आपल्या पक्षाच्या नावाने महा जनादेश जरी करील असा विश्वास मोदी – शहांना होता परंतु हा विश्वासच जणू मतदारांनी सपशेल निकालात काढला आहे.

खरे तर ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणचे  उमेदवार पराभूत झाले . मग ती लोकसभेची उदयनराजे यांची जागा  असो कि , परळीतील पंकजा मुंडे यांची जागा असो. मतदारांनी ना मुख्यमंत्र्यांच्या जनादेशाला प्रतिसाद दिला ना मोदी -शहांच्या आवाहनांना . त्याने ऐकले सर्वांचे पण केले मनाचे.

खास करून या दोन्हीही राज्यातील निकालातून मतदारांनी हे दाखवून दिले कि , तुम्ही काहीही दाखवा आम्ही दाखवू तेच तुम्हाला पाहावे लागेल. महाराष्ट्राचा विचार कायाचा झाला तर लोकांनी महायुतीला सत्तेचा कौल दिला आहे खरा पण ज्या पद्धतीच्या निकालाची अपेक्षा भाजपने ठेवली होती तास निकाल मतदारांनी लावला नाही त्यामुळे महायुतीला मतदारांनी कौल दिला असला तरी भाजपच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. शिवसेनेला फाट्यावर मारून , नामोहरण करून , त्यांचे मानसिक , राजकीय खच्चीकरण करून स्वबळावर त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची अभिलाषा होती आणि हे लपून राहिलेले नव्हते . जागा वाटप करताना सेनेला आणि मित्र पक्षांना झुलवत ठेवणे , आपण म्हणू तित्तक्याच जागा मित्रपक्षांना देणे असे प्रकार भाजपने केल्यामुळे त्यांच्या मनात सत्ता स्थापन करताना नक्कीच अपराधीपणाची भावना आहे.

शिवसेनेलाही भाजपकडून मिळणारी वागणूक काळत होती पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही , चालणार नाही , याचे शहाणपण भाजपला अधिक होते . स्वबळावर लढण्याची ताकद असेलही पण आपली निवडून येण्याची ताकद स्वबळावर नाही हे त्यांना कळत होते म्हणून उद्धव ठाकरे यांनी फार काही मनाला लावून न घेता भाजपशी युती केली अर्थात दोघेही पाच वर्षाच्या संसारात सुखी नव्हते . हे दोघांनाही माहित होते पण शेवटी सत्ता टिकवायची म्हणून दोघांनाही खोटा खोटा का होईना संसार करावा लागला.

या दोघांच्या निवडणुकीचा प्रचारही “बघून घेऊ ” याच थाटाचा होता म्हणून दोघांनीही यावेळी स्वतंत्र प्रचार केला. अखेर जे व्हायचे ते झाले आणि निकाल पुढ्यात आले आहेत. लाख कोशिश करून शंभर जागा घेऊन काय करणार ? पुन्हा सेनेची मनधरणी कारवाई लागणार अशी परिस्थिती आहे. खरे तर आपण स्वबळावर महायुती न करता लढलो असतो तर बरे झाले असते असा या नेत्यांचा सूर आहे. पण झाले ते झाले आत पुढे काय ? यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत.

दरम्यान सत्तेचे सूत्र सेनेच्या हातात गेल्यामुळे आता  देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार का?, सत्तेत समान वाटा मिळावा, असा रेटा लावून अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद, हा फॉर्म्युला शिवसेना भाजपपुढे ठेवणार का? आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याचं शिवसेनेचं स्वप्न पूर्ण होणार का?, असे अनेक प्रश्न चर्चिले जाऊ लागले आहेत.

महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवरील निर्णायक आघाडी आता समोर आली आहे. त्यात भाजप १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४४ आणि अन्य २९ असे संख्याबळ आहे. यात दोन-चार जागा मागे पुढे होण्याची शक्यता आहे. त्याअनुशंगाने २०१४च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल व यंदाचे निकाल पाहिल्यास भाजपला सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र  दिसत आहे. गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या.

भाजपने गेल्यावेळी निवडणुका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली होती तर यावेळी ही निवडणूक खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती. निवडणुकीआधी फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा काढून सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत नेण्याचे काम केले होते. या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावर बोट ठेवत भाजपला मोठा महाजनादेश मिळेल, असे दावे करण्यात येत होते. भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी स्थिती असेल तसेच महायुतीला २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असेही काही नेते सांगत होते. मात्र, हे सर्व दावे फोल ठरल्याने भाजपला आपली रणनीती बदलावी लागणार आहे .

भाजपचा आकडा कमी झाल्याने  शिवसेनेच्या आवाजाला नवी धार चढू लागली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे व आमचं ठरलंय, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असे वक्तव्य राऊत यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात केलं होतं. त्याचं स्मरणंही राऊत पुन्हा करून देत आहेत. त्यामुळेच पुन्हा सत्ता युतीचीच असेल हे स्पष्ट असलं तरी सत्तेचं सूत्र मात्र मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, असे संकेत मिळत असून त्यादृष्टीने दोन्ही पक्षांत खल सुरू झाला आहे.

निवडणुकांचे निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंचा आवाज नक्कीच वाढला आहे तर देवेन्द्र फडणवीस यांचा आवाज कमी झाला आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे राजकीय धुरंधर शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेसने तर सेनेसोबत सरकार स्थापन करण्याची आमची तयारी असेल अशी खुली ऑफर देऊन टाकली आहे .

राज्यात भाजपची झालेली गोची  हे फडणवीस यांचं अपयश असल्याचा सुप्त सूर भाजपमधील दुखावलेले निष्ठावंत नेते काढू लागले आहेत. त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्यास फडणवीस यांच्या खुर्चीला धोकाही  निर्माण होऊ शकतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये . दुसरीकडे सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना ठाम राहिल्याने भाजप नक्कीच अडचणीत आलेली असेल एवढे मात्र नक्की.

लोकसभा निवडणुकीवेळी सत्तेत समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असं सांगतानाच जागा वाटपात समजून घेतलं. सत्ता वाटपात समजून घेणार नाही, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  भाजपला दिला. मला सत्तेची हाव नाही, त्यामुळे सत्तेसाठी वेडेवाकडे पर्याय स्विकारणार नाही, असं सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्तेची ऑफरही धुडकावून लावली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून त्यानुसार भाजप, शिवसेना पुन्हा सत्ता राखताना दिसत आहे. मात्र, भाजपला मागील वेळेपेक्षा कमी जागांवर यश मिळाल्याचं दिसत आहे. तर, शिवसेनेनं युतीमध्ये कमी जागा घेऊनही मुसंडी मारली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनंही जोरदार लढत देत ‘कमबॅक’ केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी सभा घेऊनही भाजप-शिवसेनेच्या सहा मंत्र्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आवाज शिवसेनेचाच अशी परिस्थिती दिसत आहे. आता हा आवाज भाजप दाबणार कि सेनेच्या आवाजाच्या तालावर तांडव करणार ? हा प्रश्न आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!