शिवसेनेची ५०-५० ची लेखी कराराची मागणी भाजपच्या पूर्वानुभवावर आधारित , सेना तुटेपर्यंत ताणण्याच्या मनस्थितीत…

Spread the love

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपनं जे पेरले ते उगवले किंवा उगवते आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. २०१४ च्या निवडणुकीने  केंद्रात आणि राज्यात भाजपाला सत्ता मिळाली  त्यानंतर गेल्या सहा महिनांपूर्वी   झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला जे स्पष्ट बहुमत मिळाले त्या बहुमताचा जणू उन्मादच भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात दिसत आहे . बहुदा हा उन्मादाच भाजपाला एक दिवस सत्तेतून पायउतार करेल अशी परिस्थिती आहे . आणि महाराष्ट्र कदाचित त्याची सुरुवात असेल असे म्हणावयास हरकत नाही.  त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेपूर्वी शिवसेना-भाजपामध्ये तीव्र मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची ५०-५० ची लेखी कराराची मागणी भाजपच्या पूर्वानुभवावर आधारित असून सध्या तरी सेना तुटेपर्यंत ताणण्याच्या मनस्थितीत दिसत असली भाजपकडून सेनेचे मन वळविण्यात येण्याची शक्यताच अधिक आहे.

भाजप -सेनेतील परिस्थिती अशी असल्याने दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ या न्यायाने काँग्रेस- राष्टवादीचे नेते आणि खा करून राष्ट्रवादीचे शरद पवार या भांडणावर चांगलेच लक्ष ठेवून आहेत. या विषयावर प्रतिक्रिया देताना स्वतः पवार यांनीही अप्रत्यक्षरीत्या सेनेला हवा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. आज झालेल्या  बैठकीत समान सत्तावाटपाबाबत आक्रमकपणे मागणी करण्यात आली असून उद्धव ठाकरे यांनी भाजपला या मागणीबाबत अप्रत्यक्षपणे निर्वाणीचा इशारा दिला आहे. ठरल्यानुसार मिळालेच पाहिजे, आपण ठरलेल्यापेक्षा एक कणही अधिकचे मागणार नाही असे सांगताना, आपण कोणतेही वेडेवाकडे पर्याय स्वीकारणार नाही, पण… आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत असे संकेतही उद्धव यांनी दिले आहेत. हा पर्याय म्हणजे भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणे हाच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

दरम्यान आपली मागणी पदरात पाडून घेण्यासाठी भाजपवर दबाव टाकण्यासाठीच उद्धव असे बोलत आहेत असे राजकीय अभ्यासकांना वाटते. मात्र शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नाही, किंवा सरकार स्थापनेत भागही घेणार नाही, असे सांगितल्यामुळे शिवसेनेला आता भाजपसोबत जाण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नसेल हेही खरेच आहे.

आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाला ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण करुन देत अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम असल्याचे स्पष्ट केले. परंतु शेवटी शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा कितीही आग्रह धरला तरी  कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी मान्य करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

दरम्यान शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे. या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासह समसमान खातेवाटप करावे लागेल. महायुती २२० पेक्षा जास्त जागांवर विजयाचा दावा करत होती. पण भाजपाला १०५ आणि शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेचा आवाज वाढला आहे. अर्थात भाजपने शिवसेनेला गेल्या पाच वर्षात जी वागणूक दिली त्याची सेनेच्या या वर्तनाला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भाजपाकडून सत्तेचं सूत्र लेखी स्वरुपात घ्यावे अशी मागणी सेनेचे आमदार करीत आहेत.

आता या पार्श्वभूमीवर भाजपाच्या बैठकीत काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना अडीच अडीच वर्षे या फॉर्म्युलावर ठाम असल्याने  भाजपा ही अट मान्य करणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रीपदाचं काहीही ठरलेलं नाही. सत्तास्थापनेचं काय करायचं हे अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठरलं आहे. त्यामुळे त्याप्रमाणे निर्णय होईल असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेला २०१४ च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत मात्र त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. कारण भाजपाला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची गरज लागणार हे निश्चित आहे. भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. असे  असले  तरीही बहुमतासाठी लागणारा १४५ आकडा भाजपाला गाठणे  कठीण आहे त्यामुळे शिवसेनेला सोबत घेऊनच भाजपाला जावं लागणार आहे.

आपलं सरकार