Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याला बदली , गिरीश चंद्र नवे नायब राज्यपाल

Spread the love

राजयपालपद अत्यंत दुर्बल असते, राज्यपालांना पत्रकार परिषद आयोजित करण्याचे अथवा आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करण्याचे अधिकारही नसतात, असे वक्तव्य दोनच दिवसांपूर्वी करणारे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, सनदी अधिकारी गिरीश चंद्र मुरमू आणि आर. के. माथुर यांची अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे शुक्रवारी राष्ट्रपती भवनातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. मुरमू हे नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत तर माथुर गेल्या नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत.

गिरीशचंद्र मुरमू हे १९८५च्या तुकडीचे गुजरात श्रेणीचे सनदी अधिकारी असून ते केंद्रीय अर्थमंत्रालयात सचिव (खर्च) आहेत. तर आर. के. माथुर हे १९७७च्या तुकडीचे सनदी अधिकारी असून त्यांनी संरक्षण सचिव आणि माजी मुख्य माहिती आयुक्त ही पदे भूषविली आहेत.

जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश ३१ ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला.

गुप्तवार्ता विभागाचे माजी प्रमुख आणि केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये संवादक म्हणून नियुक्त केलेले दिनेश्वर शर्मा यांची लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. केरळ भाजपचे अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची मिझोरामचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!