Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : मॉलमध्ये फिरून गर्भश्रीमंतांच्या मुलांना जाळ््यात ओढणारी टोळी गजाआड, तीन लाख नेताना दोघांना पकडले

Spread the love

आधी शारीरिक संबंध ठेवायचे नंतर चित्रिकरण करून केले जायचे ब्लॅकमेल
मतदार संघात व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची दिली धमकी

शहरातील मॉलमध्ये फिरून गर्भश्रीमंतांच्या मुलांना जाळ््यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. छुप्या कॅमे-याने त्या क्षणाचे चित्रिकरण करून नंतर व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून पैसे उकळणा-या टोळीचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी प्रीती अर्जूनसिंग ठाकूर या तरूणीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उमेदवाराच्या मुलाला मतदार संघात व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन लाख रुपये उकळत असताना पोलिसांनी पकडले. या टोळीने आणखी किती गर्भश्रीमंतांच्या मुलांकडून पैसे उकळले. याचा देखील पोलिस शोध घेत आहेत.

या मधील महिला आरोपी प्रिती आणि सहानी फरार आहे.

गर्भश्रीमंतांच्या मुलांना जाळ्यात ओढून स्वत: त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्याचे छुप्या कॅमेराने चित्रिकरण करायचे. त्यानंतर शारीरिक संबंधाची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत प्रीती ठाकुर हिने अनेकांकडून पैसे उकळले. याबाबत एप्रिल २०१९ मध्ये तक्रार दिल्यानंतरही जवाहरनगर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे प्रीती ठाकुर आणि तिचा साथीदार राजू शिवशंकर साहणी (२२, रा. गजानन कॉलनी) यांची हिंमत वाढली. त्यांच्या त्रासाला वैतागलेल्या गारखेडा परिसरातील विजय प्रल्हाद राठोड (३२, रा. गजानन कॉलनी) यांनी अखेर मंगळवारी पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरुन सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दोघांना अटक केली आहे. विश्वनाथ अशोक माळी (२२) आणि कृष्णा नितीन क्षीरसागर (२१, दोघेही रा. एन-६, सिडको) अशी त्यांची नावे आहेत. गजानन कॉलनीतील विजय राठोड यांच्याशी प्रीती राठोड हिने मैत्री केली. त्यानंतर त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. दोन वर्षांपुर्वी हा प्रकार तिने छुप्या कॅमे-यात कैद केला होता. त्या आधारे तिने साथीदार राजू सहाणीच्या मदतीने विजय राठोड यांना ब्लॅकमेलींग सुरू केली. व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याने वैवाहिक जीवनात त्रास होऊ नये. म्हणून विजय राठोड यांनी २४ एप्रिल रोजी तिच्यासह राजू सहाणीला पाच लाख रुपयांची खंडणी दिली. तसेच यापुढे कोणताही संबंध राहणार नाही असा उल्लेखही शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करण्यात आला होता.
…..
मतदार संघात क्लिप व्हायरलची धमकी….
विजय राठोड यांचे वडिल धोंडीराम राठोड हे एमआयएम पक्षाच्या तिकिटावर पैठण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची प्रीती आणि राजू सहाणीला माहिती होते. त्यामुळे त्यांनी विजय राठोडकडून पैसे उकळण्याची संधी साधली. १९ आॅक्टोबरपासून दोघांनी विजय राठोड यांना धमकावण्यास सुरूवात केली. मतदार संघात व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याचे धमकावत त्यांनी तीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यामुळे धास्तावून गेलेल्या विजय राठोड यांनी थेट पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठले.
…….
सत्यता पडताळुन कारवाई……..
विजय राठोड यांनी दोघांविरुध्द १३ एप्रिल रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, जवाहरनगर पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद केली. हा प्रकार विजय राठोड यांनी पुंडलिकनगर पोलिसांना तक्रार देताना सांगितला. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी प्रकरणाची सत्यता पडताळत बुधवारी सापळा रचला. यावेळी राजू सहाणी याने बाबा पेट्रोल पंप, एमजीएम महाविद्यालय व परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी राठोड यांना बोलावले. प्रत्यक्षात मात्र पैसे घेण्यासाठी तो आला नाही. शेवटी त्यांनी एमजीएम महाविद्यालयाच्या आवारातील हॉटेल ग्रीन पार्कसमोर बोलावले. तेथील वडाच्या झाडाजवळील वॉचमनच्या बंद खोलीत तीन लाख रुपये ठेवायला सांगितले.
…….
असे अडकले जाळ्यात……
वॉचमनच्या खोलीत तीन लाखांची रक्कम ठेवण्यापुर्वी पोलिसांनी पाचशे दराच्या हुबेहुब नोटांचे सहा कागदी बंडल तयार केले. हे बंडल विजय राठोड यांनी वॉचमनच्या खोलीत ठेवले. यावेळी विश्वनाथ माळी व कृष्णा क्षीरसागर कारने (एमएच-२०-ईवाय-१४०९) विजय राठोड यांचा पाठलाग करत होते. राठोड यांनी पैसे ठेवल्यानंतर अर्ध्या तासांनी माळी व क्षीरसागर पैसे घेण्यासाठी वॉचमनच्या खोलीत गेले. यावेळी माळी मोबाईलची टॉर्च लावून पैशाची पिशवी उचलत असताना सापळा रचलेल्या पोलिसांनी त्याला तेथेच पकडले. तेव्हा संधीचा फायदा घेऊन क्षीरसागर कारने सेंट्रल नाका मार्गे आझाद चौकाकडे पसार झाला. पोलिसांनी पाठलाग करुन अखेर त्यालाही पकडले.
……..
दोघेही एमजीएमचे विद्यार्थी……
मॉलमध्ये फिरुन प्रीती ही गर्भश्रीमंतांच्या मुलांना जाळ्यात ओढत त्यांना ब्लॅकमेल करते अशी कबुली माळी व क्षीरसागरने पोलिसांना दिली. तसेच आपण एमजीएम महाविद्यालयातील अ‍ॅनीमेशन कोर्सच्या दुस-या वर्षात शिक्षण घेत असल्याचे दोघांनी सांगितले. खंडणीची रक्कम आल्यावर राजू सहाणी आणि प्रीती हे दोघेही त्यांना प्रत्येकी तीस हजार रुपये देणार होते अशीही कबुली त्यांनी पोलिसांना दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, जमादार रमेश सांगळे, विठ्ठल फरताळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, राजेश यदमळ, दीपक जाधव, जालिंदर मांटे, रवि जाधव, नितेश जाधव यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!