Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

या वेळी दिवाळी होणार पावसात साजरी ? महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस

Spread the love

मतदानाच्या दिवशी नागरिकांना काही तास दिलासा दिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला. सोमवारी रात्रीच राज्यातील काही भागांत गडगडाट, वादळी वारे आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. २३ ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. तसेच मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज पुणे शहरात जोरदार पाऊस झाल्याने अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते तर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

सध्या राज्यात पडत असलेला पाऊस हा बिगरमोसमी पाऊस आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच ईशान्य मान्सून वाऱ्यांनी दक्षिण भारतात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागात आर्द्रता कमी झालेली नाही. पुढील तीन दिवस (२२ ते २४ ऑक्टोबर) पुणे, मुंबईसह,  कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढचा आठवडाभर हवामान ढगाळ राहणार असून काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यानंतरही शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार अशी चिन्हं आहेत.

मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ या जिल्ह्यांमध्ये काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत बुधवारी मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा ही  हवामान खात्याने दिला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!