Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संतप्त जमावाचे सायन-पनवेल महामार्गावर रास्तारोको, दगडफेक

Spread the love

चेंबूर येथे राहणाऱ्या  बेपत्ता मुलीचा शोध पोलिसांनी न घेतल्याने तिच्या वडिलांना आत्महत्या करावी लागील. त्यामुळे संतप्त जमावाने चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावर रास्तारोको करत दगडफेक केली. तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलिसांचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण करण्यात अली. या घटनेमुळे चेंबूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेंबूर येथे ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणारी एक मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी या प्रकरणात नीट लक्ष न घातल्यामुळे आणि अजूनही तिचा शोध न लागल्यामुळे या मुलीच्या वडिलाने आत्महत्या केली. आज दुपारी या व्यक्तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान या अंत्ययात्रेला चेंबूर परिसरातील शेकडो नागरिक आले होते. मुलीच्या वडिलांनी नैराश्यातून आत्महत्या केली असल्याने अंत्ययात्रेत सामिल झालेल्या तरुणांनी सायन-पनवेल महामार्गावर अचानक दगडफेक करत रास्तारोको केला. त्यामुळे अंत्ययात्रेला आलेल्या जमावामध्ये एकच धावपळ उडाल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला. काही वेळातच सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान जमावाने काही गाड्यांवर आणि दुकानांवरही दगडफेक केली. यावेळी दोन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या जमावाने त्यांचा पाठलाग करून, या पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला चढवला, या हल्ल्यात हे दोन्ही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

सायन-पनवेल महामार्गावर तणाव निर्माण झाल्याची खबर मिळताच चेंबूर, कुर्ला, गोवंडी आणि आसपासच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. यावेळी जमावावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविण्यात यश मिळविले खरे, मात्र या परिसरात तणाव कायम आहे. पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध घेतला नाही. त्यामुळेच तिच्या वडिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. पोलिसांनी त्यांना वेळीच सहकार्य केले असते तर ही घटना घडली नसती. या सर्वप्रकाराला पोलीसच जबाबदार आहे. ही घटना पोलिसांना टाळता आली असती, पण पोलिसांनी ती टाळण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. तसेच पोलिसांनी आता तरी या मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणीही स्थानिकांमधून होत आहे.  दरम्यान, पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. रास्तारोको आणि दगडफेक करणाऱ्यांध्ये १६ वर्षावरील तरुणांचा मोठा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या हल्लेखोरांना पकडण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!