Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराचा आवाज थांबला, आता प्रतीक्षा मतदानाची आणि निकालाची , कोट्यवधींची बेहिशोबी रक्कम जप्त

Spread the love


मुख्यमंत्र्यांची ” मी परत येतोय..” ची घोषणा , उद्धव ठाकरेंचं “आमचं ठरलंय..” चं घोषवाक्य, शरद पवारांची सरकार उलथून राखण्याची घोषणा, वंचितांची सत्ता आणण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्धार तर राज ठाकरेंची “मला विरोधी पक्ष व्हायचंय ..” अशी मतदारांना घातलेली साद , अपक्षांची किलकिलं, महायुतीच्या मित्र पक्षांचा क्षीण झालेला आवाज आणि प्रचारापासून दूर राहिलेली कांग्रेस  हि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची वैशिष्ठे होती. आता या सर्च पक्षांचा राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शंखनाद अखेर काल  सायंकाळी ६ वाजता थांबला.


गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शनिवारी  सायंकाळनंतर शांत झाली.  सोमवारी (२१ ऑक्टोबर ) राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. तर, २४ ऑक्टोबर रोजी मतदानाचा निकाल येणार असून, निकालानंतर  राज्यात कोणाचे सरकार असणार हे ठरणार आहे.

राज्यात एकूण २८८ मतदारसंघांत ३ हजार २३९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. राज्यात ३१ ऑगस्ट पर्यंत एकूण ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदारांची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्रातील मतदान शांततेत पार पडावे म्हणून राज्यात तगडा बंदोबस्त लावला आहे. मतदान यंत्रे आज दिवसभरात प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचतील आणि सोमवारी सकाळी मतांचा हंगाम सुरु होईल. सायंकाळपर्यंत मतदान संपेल आणि प्रतीक्षा असेल ती निकालाची. दरम्यान निकालासाठी दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापासून सर्व पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. निवडणूक जाहीर झाल्यापासून एकूण ६५ सभा मुख्यमंत्र्यांनी घेतल्या, तर त्यापूर्वी महिनाभरातील महाजनादेश यात्रेदरम्यान सुमारे १६० सभा घेतल्या होत्या. याशिवाय निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सुमारे १४४ मतदारसंघ मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून पिंजून काढले होते. याचबरोबर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदींसह राज्यातील प्रमुख पक्ष नेत्यांनीही सभांचा धडका लावला होता. त्यामानाने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या निवडक सभा घेण्यात आल्या त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतीतून काँग्रेसचा आवाज घुमला नाही.

प्रचाराच्या दरम्यान  सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून रोड शो, रॅली आणि सभांच्या कॉर्नर  बैठका आदींच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पावसात केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले. तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील सभा घेतल्याने अधिकच रंगत वाढली होती.आता सर्व उमेदवारांना मतदानाच्या दिवसाचे वेध लागले आहेत. त्या अगोदर वैयक्तिक गाठी भेटींवर उमेदवारांकडून जोर दिला जाण्याची शक्यता आहे. शिवाय, मतदानाच्या दिवसापर्यंत छुपा प्रचारही सुरू असल्याचेही दिसून येते.

कोट्यवधींची बेहिशोबी रक्कम जप्त


दरम्यान निवडणुकीच्या धामधुमीत वरळी मतदार संघात ४ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मिळाल्याने आयकर विभागाला पाचारण करण्यात आलं. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होती का, याबाबत तपास करण्यात येत आहे. पण याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण वरळी निवडणूक मतदान केंद्रच्या अधिकाऱ्यांच्या मते पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र आम्हाला काही माहीत नाही, असं वरळी पोलिसांचं म्हणणं आहे.


वरळी विधानसभा मतदारसंघाकडे यंदा राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना महाआघाडीकडून सुरेश माने हे आव्हान देत आहेत. तसंच ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनीही उमेदवार अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघाची चर्चा होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू झाल्यापासून प्राप्तीकर खात्यानं मुंबईत विविध ठिकाणी छापे मारून बेहिशेबी २९ कोटी रूपयांची रोकड जप्त केली. प्राप्तीकर खाते मौल्यवान वस्तू तसेच रोख रकमेची देवाणघेवाण कुठं कुठं होत आहे, याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. यासाठी प्राप्ती कर खात्यानं मुंबईतल्या सर्व ३६ विधानसभा मतदार संघामध्ये संवेदनशील स्थानांवर जलद प्रतिसाद पथकांची (क्विक रिस्पॉन्स टिम्स) नियुक्ती केली आहे. आचार संहिता लागू असताना कोणीही रोकड अथवा मौल्यवान वस्तूंचे वितरण करण्यास मनाई आहे.

महाराष्ट्रात दि. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तोपर्यंत जलद प्रतिसाद पथके अखंड २४ तास कार्यरत राहणार आहेत. जर कोणाकडून रोकड वितरणासंबंधी विश्वासार्ह माहिती मिळाली की त्यावर राज्य पोलिसांचे सहकार्य घेऊन कारवाई करण्यात येत आहे. तसेच इतर कायदा अंमलबजावणी संस्थांशीही समन्वय साधून कार्य केले जात आहे, असं प्राप्तीकर खात्याच्या मुंबई विभागानं स्पष्ट केलं. विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पडाव्यात तसेच या काळात पैशाचा गैरवापर होवू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!