Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद शहरात संततधार पाऊस , मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज

Spread the love

कालपासून औरंगाबाद शहरात जोरदार पावसाला प्रारंभ झाला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पूर्वमध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वात स्थिती येत्या ४८ तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. मुंबईकरांना मात्र घाबरण्याचे कारण नाही असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे, तसेच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर या विभागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज आहे. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले, तरी याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता नाही, तसेच हे क्षेत्र किनारपट्टीपासून लांब असल्याने फार धोका नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात सोमवारपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे बुधवारपर्यंत, पुण्यात मंगळवारपर्यंत, मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड येथे उद्या, सोमवारपर्यंत तर औरंगाबादमध्ये आज, रविवारी मेघगर्जना, विजा आणि जोरदार वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तेव्हा ढगही दिसू लागतात. मात्र मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ‘मुंबईत आज व उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील आणि ढगाळ वातावरण कायम राहील’, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु  परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागातही  मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे मतदेखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

दरम्यान शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत लोकांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहनदेखील करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!