Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाड्यासह मुंबई, ठाणे , पुणे आणि पश्चिम महाराट्रात जोरदार पावसामुळे मतदानाविषयीच्या चिंता वाढल्या ….

Spread the love

महाराष्ट्रात प्रचार संपल्यानंतर ज्या दिवसाची प्रतीक्षा केली जात होती तो दिवस उद्या येत असला तरी महाराष्ट्रावर पावसाची सर्वदूर छाया असल्यामुळे त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील मतदान होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांचा आणि उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. काल परवा प्रचाराच्या अखेरच्या दिवशीच मराठवाडा , मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे प्रचारावर तर पाणी फिरलेच पण उद्या होणाऱ्या पावसामुळे मतदानावरही पाणी फेरते कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे . कारण गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची रिपरिप सुरू असून येत्या ४८ तासांत मुंबईसह राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्रासह , पुणे , मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.  काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज औरंगाबाद , कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सातारा आणि कोल्हापूरला तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर आणि साताऱ्यात जोरदार पाऊस झाल्याने महामार्गावर पाणी भरले होते. त्यामुळे साताऱ्यात काही काळासाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. काही काळाने पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू करण्यात आली असून ही वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याचं सांगण्यात आलं. कोल्हापूर आणि साताऱ्यात अनेक घरांमध्ये पाणीही भरल्याने येथील नागरिकांची दाणादाण उडाली आहे. दरम्यान  सायंकाळपर्यंत कोल्हापूर आणि साताऱ्यातील पावसाचा जोर कमी होणार असल्याचंही हवामान खात्याने स्पष्ट केलं असलं तरी , कोल्हापूर आणि साताऱ्यात उद्याही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, उद्याही  मुंबई, पालघर, ठाण्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, औरंगाबादमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. मात्र  धुळे आणि नंदूरबारमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट असल्याने त्याचा फटका उद्या होणाऱ्या मतदानाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांची चिंता वाढली आहे.

दरम्यान आज दुपारनंतर  कोल्हापूरला मुसळधार पावसाने जोरदार झोडपून काढले आहे. ढगफुटीसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून रस्त्यांवर पाण्याचे प्रचंड लोट वाहत आहेत. त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक शहरांच्या  ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक मतदान केंद्रांवर चिखल झाला आहे. काही ठिकाणी पाणी साचले असून या पाण्याचा उपसा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यातही काही मतदान केंद्रांभोवती पाणी साचल्याने चिखल झाला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या मतदान केंद्रांवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!