Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केबीसीच्या प्रोमोमध्ये आली पद्मश्री सुनीता कृष्णन यांच्या बलात्काराची कथा, अमिताभही जेंव्हा निशब्द होतात…

Spread the love

केबीसीच्या स्पर्धक आणि समाजसेविका सुनीता कृष्णन यांनी त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक गोष्टी सांगितल्याने खुद्द महानायक अमिताभ बच्चनही हादरून गेले आहेत. वयाच्या १५ व्या वर्षी सुनीता यांच्यावर ८ जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. तर आतापर्यंत त्यांच्यावर १७ वेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सुनीता यांनी हे धक्कादायक वास्तव सांगितल्याने अमिताभ बच्चनही काहीकाळ नि:शब्द झाले होते.

सुनीता कृष्णन या ‘प्रज्ज्वला’ या स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत. महिलांची होणारी तस्करी, लैंगिक शोषण आणि त्यांच्यावरील अत्याचारावर ही संस्था काम करते. ‘कौन बनेगा करोडपती’चा प्रत्येक आठवड्याला ‘कर्मवीर’ नावाचा विशेष भाग प्रसारित केला जातो. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवींना या कार्यक्रमामध्ये बोलावण्यात येतं. यावेळी सुनीता यांना ‘कर्मवीर’च्या विशेष भागात आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याचा प्रोमो आला असून त्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला आहे.

१५ वर्षाची असताना माझ्यावर ८ लोकांनी बलात्कार केला होता. महिलांची वेश्या व्यवसायातून मुक्तता करत असताना आतापर्यंत माझ्यावर १७ वेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र मी मृत्युला घाबरत नाही. जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे, तोपर्यंत वेश्या व्यवसायाच्या नरकातून महिलांची मुक्तता करतच राहणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सुनीता यांनी आतापर्यंत २२ हजार तरुणी आणि महिलांची लैंगिक शोषणातून मुक्तता केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने २०१६मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे. महिलांची वेश्या व्यवसायातून मुक्त केल्यानंतर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यात येतं. त्यांना अभिमान वाटेल अशी कामे शिकवली जातात. विशेष म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेली कामं या महिलांना शिकवली जातात, असं त्यांनी सांगितलं. लैंगिक शोषणातून किंवा वेश्याव्यसायातून महिलांची मुक्तता करण्यासाठी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा मला टाळ्यांऐवजी शिव्याच मिळालेल्या आहेत. आपमान सहन करावा लागला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सुनीता यांचा जन्म बेंगळुरुचा. त्यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती. वयाच्या ८ व्या वर्षापासून त्यांनी मानसिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या लहान मुलांना नृत्य शिकवायला सुरुवात केली. वयाच्या १२ व्या वर्षी वंचित घटकांच्या मुलांना झोपडपट्टीत जाऊन शिकविण्याचं कामही त्यांनी केलं. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी दलित समाजात नव साक्षरता अभियान सुरू केलं. तेव्हा ८ लोकांनी त्यांच्यावर बलात्कार केला. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत एका महिलेची लुडबूड सहन न झाल्यानेच हे कृत्य करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

सुनीता यांना बेदम मारहाणही झालेली आहे. या मारहाणीत त्यांचा एक कान किंचित निकामी झाला असून त्यामुळे त्यांना कमी ऐकू येतं. मात्र तरीही त्यांनी हार मानलेली नाही. समाजसेवेचं बालपणापासून अंगिकारलेलं व्रत त्यांनी सुरूच ठेवलेलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!