Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप-शिवसेनेच्या काळात एकही सामाजिक घटक सुखी नाही : शरद पवार

Spread the love

“मुंबईत एकेकाळी मोठ मोठ्या मिल होत्या. आज त्या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. शेतकरी असो किंवा कामगार मागच्या पाच वर्षात दोन्ही वर्गांच्या हिताची जपणूक झालेली नाही. त्यामुळे राज्यात आत्महत्या वाढल्या आहेत.”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते. भाजप-शिवसेनेच्या काळात एकही सामाजिक घटक सुखी नाही. मी अनेकवेळा राज्यव्यापी दौरा केला. ग्रामीण भागातील लोकांमध्ये सरकारविरोधात चीड आहे. मागच्या पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे पवार यांनी सांगितले.

अणुशक्ती नगर मतदारसंघात झोपडपट्टी, प्रदूषणाच्या अनेक समस्या आहेत. विशेषत: आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. नवाब मलिक हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासोबत मी देखील झोपडपट्ट्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून तयार असल्याचेही शरद पवार म्हणाले.

“नवाब मलिक यांनी गृह राज्यमंत्री म्हणून उत्तम काम केले होते. २०१४ साली अतिशय थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला असला तरी ते नाउमेद झाले नाहीत. निकालाच्या दुसऱ्या दिवसांपासून ते त्याच तडफेने जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यामुळे यावेळी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे”, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!