Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुलांना अन्न देण्यात भारत नेपाळ , बांगला देश, पाकिस्तानपेक्षाही मागे , पवार म्हणाले हि तर जागतिक बेइज्जती

Spread the love

भारतापेक्षा नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानातही मुलांना अधिक अन्न मिळतं, ही बातमी भारतासारख्या अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या देशासाठी चांगली आहे का?, असा सवाल करत सध्याच्या भाजप सरकारच्या काळात जागतिक पातळीवर देशाची सर्वाधिक बेइज्जती झाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली.

निफाड मतदारसंघातील उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी पवार यांची पिंपळगाव येथे सभा झाली. या सभेत बोलताना पवारांनी राज्य, केंद्र सरकार व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देशाचे पंतप्रधान वा त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्री भारतात आणि भारताबाहेरही दौरे करत असतात. अर्थात ते परदेशात जाऊन जे बोलतात ती देशाची भूमिका असते, असे नमूद करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेत जाऊन केलेल्या विधानावर पवारांनी आक्षेप नोंदवला. भारताची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन गव्हर्नरांमुळे डबघाईला आली आहे, असं विधान सीतारामन यांनी अमेरिकेत जाऊन करणे योग्य नाही, असे सांगतानाच परदेशात जाऊन देशातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल टीकाटिपण्णी करायची नाही, इतकीही जाण तुम्हाला नाही का?, असा सवाल पवारांनी केला. पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेचा मान त्यांनी व आम्हीही ठेवला पाहिजे, असेही पवार पुढे म्हणाले.

दिल्ली काँग्रेस मुख्यालयावर धाड टाकण्यात आली. कार्यालयातील चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अशाच प्रकारे मलाही त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणुका आल्या की हे प्रकार सुरू होतात. राज्य चालवायची ही कोणती पद्धत?, असा सवाल पवार यांनी केला. आज कोण कुणाच्या ओळखीचा आहे, इतक्या क्षुल्लक कारणावरून गुन्हे दाखल केले जात आहेत, असे नमूद करताना सत्ता येते आणि जाते पण सत्ता हातात असताना पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि डोकं जाग्यावर ठेवायचं असतं, याचं भान ठेवा, असा सल्ला पवारांनी भाजपला दिला.

राज्यात शेतकऱ्यांची दैना झाली आहे, शेतकरी आत्महत्या दिवसागणिक वाढताहेत, कारखाने आजारी पडले आहेत. मंदिचे संकट आले आहे. लोकांची रोजीरोटी जात आहे. सगळ्याबाजूने महाराष्ट्र संकटात सापडला आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचे असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, असे आवाहन पवार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील सभेत जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा महाराष्ट्राशी काय संबंध?, असा प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांवर तोफ डागली होती. महाराष्ट्रातील अनेक जवान देशाच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये शौर्य गाजवत आहेत. येथील अनेक जवान तिथे शहीद झाले आहेत. असे असताना महाराष्ट्राचा काश्मीरशी काय संबंध?, असा प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव वाटते, अशी तोफ डागत ‘डूब मरो’ असा संताप या नेत्यांबद्दल मोदींनी व्यक्त केला होता. त्यावर पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कलम ३७० रद्द केल्यानंतर ते पुन्हा आणून दाखवा, असे आव्हान तुम्ही विरोधी पक्षांना का देत आहात, असा सवालही पवारांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!