Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राच्या अर्थकारणाला मोठा फटका, गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य भाजपच्या काळात मागे गेले : मनमोहनसिंग

Spread the love

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज आपल्या मुंबई दौऱ्यात अर्थव्यवस्थेवरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या देशातील अर्थव्यवस्थेवरील वक्तव्याला उत्तर देताना फक्त विरोधकांना जबाबदार ठरवून अर्थव्यवस्था सुधारणार नाही असा टोला लगावला. अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे हि जर तुमची भावना असेल तर  त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राबद्दल बोलताना  मनमोहन सिंग यांनी राज्यातील वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुनही केंद्र सरकारवर टीका केली. “एकेकाळी महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता. पण आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे,” असं त्यांनी म्हटले आहे.

“अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योग्य उपचार करणं गरजेचं आहे. सरकार फक्त विरोधकांवर टीका करत आहे, आणि यामुळेच त्यांना उपाय सापडत नाही आहे,” असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. निर्मला सीतारमन यांनी मनमोहन सिंग, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेची स्थिती जास्त वाईट होती अशी टीका केली होती. त्याला आज मनमोहन सिंग यांनी चोख उत्तर देत सरकारला आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

दरम्यान सावरकरांबद्दलच्या एका प्रश्नाच्या उत्तरात मनमोहनसिंग म्हणाले कि , काँग्रेस सावरकरविरोधी नाही तर हिंदुत्वाच्या विरोधात आहे .  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होते आहे या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी केलेलं हे वक्तव्य मोठं आणि तितकंच महत्त्वाचं आहे यात काहीही शंका नाही. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ पोस्टाच्या तिकिटाचं अनावरण केलं होतं ही आठवणही मनमोहन सिंग यांनी सांगितली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था कमकुवत होण्यासाठी सरकारचा निष्काळजीपणा आणि असमर्थता कारणीभूत असल्याचं सांगत याचा फटका अनेक राज्यांना आणि खासकरुन महाराष्ट्राला बसत असल्याचं सांगितलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “अर्थव्यवस्था मंदावली असल्या कारणाने महाराष्ट्रा अनेक समस्यांचा सामना करत असून, मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली,” असल्याचं मनमोहन सिंग यांनी सांगितलं.

भाजप सरकारवात टीका करताना ते म्हणाले कि , “भाजपाने ज्या आधारावर लोकांकडून मतं मागितली होती, ते मुद्दे अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्रातील उत्पादन वाढ सलग चौथ्या वर्षी खालच्या स्तरावर आहे,” असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात अनेक संधी उपलब्ध असून सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक तरुणांना कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागत असल्याची टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!