Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : दहावी , बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा झाल्या जाहीर

Spread the love

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होणार आहे आणि १८ मार्च २०२० रोजी संपणार आहे, तर दहावीची परीक्षा ३ मार्च २०२० रोजी सुरू होणार आहे आणि २३ मार्च २०२० ला संपणार आहे. दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने ‘mahahsscboard.in’या आपल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहे. यंदा ४ महिने आधीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असल्याचेही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी म्हटले आहे.

डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले की, हे संभाव्य वेळापत्रक असेल. छापील स्वरूपातील अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना नंतर देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावरून प्रसिद्ध आणि व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे. दरम्यान, फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औंरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळांमार्फत एकाच वेळी बारावी आणि दहावीची लेखी परीक्षा होणार आहे, असे जाहीर केले आहे

शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, यासाठी यंदा 4 महिने आधीच परीक्षांची तारीख लवकर जाहीर करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. त्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२० च्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालयांना संपूर्ण वेळापत्रक लवकरच पाठवण्यात येईल असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे किंवा राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात असे आवाहन मंडळाने केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!