Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बाबरी मशीद -राममंदिर वादविवाद : युक्तिवाद पूर्ण , १७ नोव्हेंबरला निकाल येण्याची शक्यता

Spread the love

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयात हाय व्होल्टेज ड्राम पहायला मिळाला. हिंदू पक्षकारांनी पुरावा म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केलेला नकाशा न्यायालयातच फाडून टाकण्यात आला. मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हिंदू महासभेच्या वकिलाकडून सादर करण्यात आलेला नकाशा सरन्यायाधीश यांच्यासमोर फाडून टाकला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. १७ नोव्हेंबरला निकाल येण्याची शक्यता आहे.

हिंदू महासभेचे वकील विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे पुरावा म्हणून पुस्तक सादर करण्याची परवानगी मागितली होती. हे पुस्तक माजी आयपीएस अधिकारी किशोर कुणाल यांनी लिहिलेलं आहे. यावर मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी आक्षेप घेतला. हे पुर्णपणे नवीन पुस्तक असून, रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

हिंदू महासभेच्या वकिलांनी युक्तिवाद करत न्यायालयाने हे पुस्तक आणण्यासाठी परवानगी दिली असून, यामध्ये प्रभू रामाच्या जन्मस्थानाची योग्य माहिती देणारा नकाशा असल्याचं सांगितलं. यावर राजीव धवन यांनी उत्तर देत, मी ही कागदपत्रं फाडून टाकेन अशी धमकी दिली. काही वेळाने त्यांनी सिंह यांच्याकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रं फाडून टाकली. यानंतर त्यांनी सरन्यायाधीशांच्या परवानगीनेच आपण ही कागदपत्रं फाडली असल्याचा दावा केला.

दरम्यान याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना १६ ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचा आदेश दिला होता. सलग ४० व्या दिवशी सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान हिंदू महासभेच्या वकिलांनी नव्या पुस्तकातील नकाशात सीतामाता यांचं स्वयंपाकघर असल्याचा पुरावा आहे अशी माहिती दिली. हिंदू पक्षकार हा युक्तिवाद करत असताना राजीव धवन यांनी पुन्हा एकदा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण सिंह यांनीही मोठ्या आवाजात आपलं म्हणणं माडंलं.

यानंतर मात्र सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जर अशाप्रकारे सुनावणी सुरु राहणार असेल तर आम्ही निघून जाऊ असं सांगितलं. तसंच त्यांनी पुरावा म्हणून सादर करण्यात आलेलं पुस्तक आपल्याकडे ठेऊ का अशी विचारणा करत सलग वाचणार असल्याचं सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!