Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PMC Bank : बुडालेल्या बँकेत ९० लाख अडकल्याची ताण -तणावातून खातेदाराचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Spread the love

पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेत (पीएमसी) पैसे अडकले असल्याने अनेकांवर संकट कोसळलं असून एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. ५१ वर्षीय संजय गुलाटी यांचा ह्रदय बंद पडल्याने मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे, पीएमसी बँकेविरोधात आंदोलन करुन घरी परतले असता काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. संजय गुलाटी ओशिवरामध्ये राहत होते. ओशिवरामधील पीएमसी बँकेच्या शाखेत त्यांचं खातं होतं. जवळपास ९० लाख रुपये त्यांचे बँकेत अडकले होते.

संजय गुलाटी यांना एकमागोमाग एक अनेक धक्के मिळत होते. संजय गुलाटी जेट एअरवेजचे कर्मचारी होते. पण एप्रिल महिन्यात त्यांची नोकरी गेली. यानंतर बचत केलेल्या पैशांमधून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण याचवेळी पीएमसी बँकेतील घोटाळ्याची बातमी समोर आली. संजय गुलाटी यांनी पीएमसी बँकेत ९० लाख रुपये जमा केले होते. पीएमसी घोटाळ्याची माहिती मिळताच त्यांची झोप उडाली. आरबीआयने कारवाई केल्याने पीएमसी बँकेत अडकलेले पैसेही काढणं त्यांना शक्य नव्हतं.

संजय गुलाटी यांच्या कुटुंबाची पीएमसी बँकेत एकूण चार खाती होती. यामध्ये त्यांचे आई, वडील आणि पत्नीचाही समावेश होता. या सर्व खात्यांमध्ये मिळून एकूण ९० लाख रुपये होते. संजय गुलाटी सोमवारी खातेदारांनी काढलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. तिथे त्यांनी आपल्याप्रमाणेच अनेक हतबल खातेधारकांना पाहिलं होतं. घऱी परतल्यानंतर काही वेळातच त्यांचं ह्रदय बंद पडलं आणि मृत्यू झाला.

संजय गुलाटी यांच्या एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, संजय यांना मुलावर उपचार करण्यासाठी पैशांची गरज होती. बँकेतून पैसे काढू शकत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते प्रचंड तणावात होते. संजय गुलाटी यांनी संध्याकाळी घरी आल्यानंतर पत्नीला जेवण वाढण्यास सांगितलं. जेवत असतानाच त्यांचं ह्रदय बंद पडलं आणि मृत्यू झाला. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

दरम्यान आरबीआयने पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर घातलेली २५ हजारांची मर्यादा ४० हजारांवर नेली आहे. बँकेच्या संतप्त खातेदारांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची भेट घेतल्यानंतर याप्रकरणी आरबीआयला लक्ष घालण्यास सांगू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. यानंतर ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!