Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PMC : दिवाळखोरीत निघालेल्या पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू

Spread the love

वादग्रस्त पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत खाते असलेले ग्राहक संजय गुलाटी यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला २४ तासही उलटत नाहीत तोच आज दुपारी मुलुंड येथील ६१ वर्षीय खातेधारक फट्टोमल पंजाबी यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  आयुष्यभराची कमाई मिळणे दुरापास्त झाल्याच्या चिंतेमुळे प्रचंड तणावाखाली असलेल्या फट्टोमल यांना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या गोकुळ रुग्णालयात नेले मात्र तिथे तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट झाले.

फट्टोमल हे आज बँकेत जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. फट्टोमल यांना विकास आणि गीता (विवाहित) अशी दोन मुलं असून मार्च महिन्यात पत्नीचं निधन झाल्यानंतर ते घरात एकटेच राहत होते, असे त्यांचे बंधू दीपक पंजाबी यांनी सांगितले.

फट्टोमल हे फट्टू म्हणून परिचित होते. सचखंड दरबार गुरुद्वार आणि जवळच्या झुलेलाल मंदिरातही सेवा करायचे. एक सज्जन माणूस आमच्यातून गेल्याची भावना त्यांच्या सहकारी कोमल पंजवानी यांनी व्यक्त केल्या. फट्टोमल यांच्या खात्यात ८ ते १० लाख रुपये होते. ही त्यांच्या आयुष्याची कमाई होती, अशी माहिती गुरीज्योत सिंग यांनी दिली.

मुलुंड कॉलनीतील हजारो सिंधी आणि पंजाबी नागरिकांची खाती पीएमसी बँकेत असून बँकेवरील निर्बंधांमुळे ही सगळीच कुटुंबं हादरली आहेत. रिझर्व्ह बँकेकडून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली असली तरी प्रत्यक्ष पैसे काढण्यासाठी आम्हाला मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत. आधी हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली. नंतर १० हजार, १५ हजार आणि आता ४० हजार रुपये अशी त्यात टप्प्याटप्याने वाढ करण्यात आली. या सगळ्यात वयोवृद्ध खातेधारकांना किती त्रास होत आहे, याचा कुणी विचार केला आहे का?, असा संतप्त सवाल कोमल यांनी केला.

संजय गुलाटी आणि फट्टोमल पंजाबी अशा दोन खातेधारकांच्या मृत्यूमुळे पीएमसी बँकेच्या खातेधारकांच्या आंदोलनाला वेगळे वळण लागले असून या दोघांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी कँडल मार्च काढण्यात येणार आहे. पीएमसी बँकेच्या खातेधारकांवर संकट कोसळलं असताना त्यावर सोयीस्कर मौन बाळगणाऱ्या राजकीय नेत्यांना या कँडल मार्चमध्ये प्रवेश नसेल, असेही आयोजकांनी बजावले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!