Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कणकवली : राज्यभरात महायुतीचे कीर्तन तर कणकवलीत मात्र तमाशा , आमने -सामने उभ्या असलेल्या आपल्या उमेदवारांच्या सभेसाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा

Spread the love

एकीकडे राज्यभरात शिवसेना आणि भाजप महायुतीचे स्टार प्रचारक मतदारांना आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. मात्र, दुसरीकडे सिंधुदुर्गातल्या कणकवली मतदारसंघात मात्र या दोन्ही पक्षांचे राज्यातले प्रमुख अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच प्रचाराची रणधुमाळी रंगताना पाहायला मिळणार आहे. नुकतेच स्वाभिमान पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले नितेश राणे यांना भाजपने कणकवलीमधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी येत्या १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. मात्र, त्यांच्याच विरोधात शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे आता सावंतांच्या प्रचारासाठी दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे १६ तारखेला कणकवलीतच प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे आता कणकवलीकरांची मात्र चांगलीच पंचाईत होणार आहे.

नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र यांना शिवसेनेचा असलेला विरोध जगजाहीर आहे. त्यातूनच राणेंच्या उमेदवारीला शिवसेनेकडून मोठा विरोध करण्यात आला होता. राणेंच्या भाजप प्रवेशावर देखील शिवसेनेकडून आडकाठी आणली जात असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंना भाजप प्रवेश देऊन त्यांना कणकवलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवलीमध्ये स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याला तीव्र विरोध केला. तसेच, सतीश सावंत यांनी नितेश राणेंच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता राज्यात एकमेकांसोबत असलेल्या शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष कणकवलीत मात्र एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, कणकवलीप्रमाणेच सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याविरोधात भाजपचे राजन तेली तर कुडाळ-मालवणमध्ये वैभव नाईक यांच्याविरोधात नारायण राणेंचेच कार्यकर्ते रणजित देसाई अशी लढत होणार आहे. त्यामुळे तळकोकणात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप या पारंपरिक मित्रपक्षांमध्येच धुमशान पाहायला मिळणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!