Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेची पुन्हा एकदा चर्चा , शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार

Spread the love

शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. केवळ काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई करण्यात आली, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवारांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शुक्रवारी (ता.११) एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वरील विधान केल्याने त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहेत. दरम्यान या सर्व चर्चा म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून देणाऱ्या पवार यांनी यानिमित्ताने स्वपक्षातील काही नेत्यांनाही लक्ष्य केल्याचे मानले जात आहे. “बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूकच होती. त्याकाळात आमचंही स्वत:च मत होतं की इतके टोकाचे राजकारण करू नये. परंतु, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. केवळ काही काही वरिष्ठ नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेबांच्या अटकेचा निर्णय घ्यावा लागला”, असा गौप्यस्फोट पवार यांनी केला. सोबतच आम्ही त्यावेळी संबंधित व्यक्तीला विचारलं की असे का करताय, तेव्हा ते म्हणाले, की आम्ही या विभागाचे प्रमुख आहोत.

आम्हाला योग्य वाटतो तो निर्णय आम्ही घेणार आहोत, असा खुलासाही पवार यांनी केला. अर्थात बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांची नावे त्यांनी थेटपणे उघड केली नसली तरी छगन भुजबळ हे तत्कालीन गृहमंत्री होते. त्यामुळे पवार यांनी त्यांच्याकडेच अंगुलीनिर्देश केला की काय, असे म्हणण्यास जागा आहे. तसे असेल तर केवळ राष्ट्रवादीतच नव्हे तर शिवसेनेतही या विधानावरून घमासान होऊ शकते. पवार यांच्या या गौप्यस्फोटाला अनेक राजकीय कांगोरे असल्याने निवडणुकीनंतर त्याचे पडसाद खऱ्या अर्थाने उमटू शकतील. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणात बाळासाहेबांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करीत तत्कालीन आघाडी सरकारने सूडाचे राजकारण केल्याची टीका केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!