Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सांगलीच्या प्रचार सभेतही अमित शहा यांचे ३७० आणि भारत -पाकच्या संबंधावर भाष्य , म्हणाले आपला एक जवान शाहिद झाला तर त्यांचे १० मारू …

Spread the love

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज ते कोल्हापुरात होते . जत येथील प्रचार सभेसाठी जाताना कोल्हापूर विमानतळावर थांबल्यानंतर ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. दरम्यान, शहा यांनी सांगलीतील सभेतून भारताच्या शत्रू देशांना ठणकावले. यापुढे भारताचा एक जरी जवान शहीद झाला तर त्याबदल्यात शत्रुचे १० सैनिक मारले जातील, असे शहा यांनी निक्षून सांगितले.  यावेळी काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले कि ,  ‘निवडणुकीत पक्षाच्या नेत्याने आपल्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम राहणे गरजेचे असते. या स्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी मैदान सोडून बाहेर गेले आहेत. विरोधी पक्षासाठी हा प्रकार चांगला नाही .

सांगलीच्या उमेदवारांसाठी आयोजित  सभेला जाण्यासाठी ते गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास खास विमानाने कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि राहुल चिकोडे यांनी शहा यांचे स्वागत केले. यावेळी शहा दहा मिनिटे विमानतळावरील विश्रामकक्षात थांबले. त्यांनी कोल्हापूरसह परिसरातील पक्षीय बलाबल आणि उमेदवारांचा आढावा घेतला. बंडखोरी केलेल्या उमेदवारांसह जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांचीही त्यांनी माहिती घेतली. कोल्हापुरात काँग्रेसकडून अद्याप मोठी प्रचार सभा झाली नसल्याची माहिती मिळताच त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

यावेळी बोलताना शहा पुढे  म्हणाले कि , ‘लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. त्रिपुरामध्ये आम्ही रस्त्यावर उभे राहून भाजपचे २५० सदस्य बनवले. यानंतर एक हजार लोकांची सभा घेतली. आज त्रिपुरात भाजप सत्तेत आहे. ‘ राज्यातील युतीच्या प्रचाराबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. राज्यात युतीचे २२० हून अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरातील सभेबाबत मात्र त्यांनी साशंकता व्यक्त केली. या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी सभांचे नियोजन असल्याने कोल्हापूरसाठी वेळ मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. अखेरच्या दोन दिवसात शक्य झाल्यास कोल्हापूरसाठी सभा घेण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, अशोक देसाई, विजय जाधव, आदी उपस्थित होते.

सांगलीतील सभेतून अमित शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यास तीव्र विरोध केला होता. हे कलम हटवल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, असे राहुल गांधी म्हणाले होते. मात्र ५ ऑगस्टपासून ५ ऑक्टोबरपर्यंत काश्मिरात एकही गोळी चालली नाही किंबहुना चालवावी लागली नाही. तिथे सगळं काही सुरळीत सुरू आहे, असा दावा करतानाच पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार यापुढे भारताचा एक जवान शहीद झाला तर त्याबदल्यात १० शत्रू मारले जाणार आहेत, असे शहा यांनी ठणकावून सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!