Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी जाणा-या पाच जणांना बसने उडवले, १५ वर्षीय बालकाचा भीषण अपघातात मृत्यू

Spread the love

एकाला मानसिक धक्का, दोघांची प्रकृती स्थिर, एक गंभीर | रविवारी पहाटे सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली घडला अपघात

कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी जाणा-या पाच तरुण भाविकांना एका प्रसारमाध्यमाच्या भरधाव बसने उडवले. या भीषण अपघातात एका १५वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे. तसेच मानसिक धक्का बसल्याने एकावर मनोविकार तज्ज्ञांकडून उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा भीषण अपघात सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली पहाटे चारच्या सुमारास अंगिठी हॉटेलसमोर झाला. या अपघाताची नोंद पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघातास कारणीभूत असलेली बस पोलिसांनी जप्त केली असून हि बस दैनिक लोकमतची असल्याचे सांगितले.

दरम्यान  केंब्रिज चौक ते सावंगी रस्त्यावर झालेल्या दुस-या अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी झाला. या अपघातातील जखमीवर घाटीत उपचार सुरू आहेत. हि बातमी सुद्धा वाचा

औरंगाबाद सावंगी बायपासवर अपघात, एक जण ठार तर दुसरा जखमी

विजयादशमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आलेला असल्याने कामातून वेळ काढत रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अनिकेत शिवाजी काळवणे (१५), संदीप श्रावण बनसोडे (१५), आदित्य सिध्दार्थ गायकवाड (१६), शुभम संजय नरवडे (१६, सर्व रा. गल्ली क्र. ५, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी) आणि सुदर्शन सोळंके (१७, रा. आळंदी) असे पाच तरुण मुकुंदवाडीतून कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी निघाले. हे पाचही जण सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली असलेल्या अंगिठी हॉटेलसमोरील रस्त्याच्या कडेने जात होते. यावेळी शेंद्रा येथून कामगारांची वाहतुक करणा-या एका एका दैनिकाच्या भरधाव बसने (एमएच-२०-डीडी-०१७२) पाठीमागून पाचही भाविक तरुणांना जबरदस्त धडक दिली.

या भीषण अपघातात अनिकेत काळवणे, संदीप बनसोडे, आदित्य गायकवाड, शुभम नरवडे आणि सुदर्शन सोळंके हे पाचही जण जखमी झाले. त्याचवेळी  मुकुंदवाडीतून दर्शनासाठी जात असलेल्या अन्य भाविकांनी हा अपघात पाहिला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक केली. त्यात बसची समोरील काच फुटली. अपघातानंतर चालक बाळु गंगाधर लोखंडे (३२, रा. गल्ली क्र. ९, न्यू हनुमाननगर, मातोश्री क्लिनिकजवळ) याने बससह घटनास्थळावरुन धुम ठोकली. याचवेळी तेथून जात असलेल्या लतीफ पठाण यांनी वाहनातून पाचही जखमींना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अपघाताची माहिती अनिकेतचे काका संतोष काळवणे यांना दिली.


एकुलत्या एक अनिकेतचा मृत्यू…….
अपघातातील पाचही जणांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर या घटनेची माहिती मुकुंदवाडी भागात वा-यासारखी पसरली. त्यानंतर जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचारादरम्यान अनिकेत काळवणे याचा मृत्यू झाला. या अपघातात अनिकेतचा मृत्यू झाल्याचे समजताच संदीप बनसोडेला तीव्र मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञांकडून उपचार करण्यात येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अनिकेतचे वडिल रिक्षाचालक आहेत. सहा महिन्यांपुर्वीच त्याच्या थोरल्या बहिणीचा विवाह झाला. त्याने दहावीची परीक्षा दिली होती. तो एकुलता एक होता. शिक्षणासह तो वाळुज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत रात्रपाळीची नोकरी करायचा. शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने अनिकेत आणि त्याच्या मित्रांनी पहाटे देवीच्या दर्शनाला जाण्याचे ठरवले होते.


बस चालकाला शेंद्र्यात पकडले…….
अपघाताची माहिती मिळाल्यावर पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस चालकाने शेंद्र्याच्या दिशेने धाव घेतल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी शेंद्र्याच्या दिशेने धाव घेत चालकाला अटक करुन बस हस्तगत केली. याप्रकरणी बसचालक बाळु लोखंडे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक रावसाहेब मुळे करत आहेत.
…….
आजीला भेटण्यासाठी आला सुदर्शन…..
पुर्वी मुकुंदवाडीतील शिवाजी कॉलनीत राहत असलेला सुदर्शन सोळंके हा दोन दिवसांपुर्वीच आजीच्या भेटीसाठी आला होता. गेल्या काही वर्षांपुर्वी तो आई-वडिलांसोबत पुण्यातील आळंदीला राहायला गेला होता. जुने मित्र भेटल्यामुळे रविवारी पहाटे देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे सर्व मित्रांनी ठरवले होते. मात्र, अनिकेतवर काळाने घाला घातला.
……..
बसचा फक्त इन्श्युरन्स…….
अपघातग्रस्त बसचा इन्श्युरन्स २०आॅगस्ट २०२० पर्यंत आहे. तर फिटनेस २७ आॅगस्ट २०१६, टॅक्सची मुदत ३१ आॅगस्ट २०१५ आणि परमिटची मुदत ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंतची आहे. या बसला खरेदी करुन पाच वर्ष एक महिना झाल्याची नोंद आॅनलाईन मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच या बसचे रजिस्ट्रेशन २५ आॅगस्ट २०१४ रोजी करण्यात आलेले आहे.
……….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!