Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Kothrud Vidhansabha : भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या पाठिंब्यावरून ब्राह्मण महासंघात फूट , कुणाचा पाठिंबा तर कुणाचा विरोध कायम

Spread the love

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी कायम असून, त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात आता ब्राह्मण संघटनांमध्येच एकमत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने प्रसिद्धी पत्रक काढत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, हा पाठिंबा प्रदेश कार्यकारिणीने दिला असून, राष्ट्रीय कार्यकारिणीने दिलेला नाही. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पाटील यांना महासंघाने पाठिंबा दिला नाही, प्रदेश कार्यकारिणीने परस्पर हा निर्णय घेतला आहे, असा दावा केला आहे.

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे ब्राम्हण समाजात नाराजी निर्माण झाली आहे. ब्राम्हण महासंघाकडून मयुरेश अरगडे हे रिंगणात उतरले आहेत. अरगडे हे महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. महासंघाची नाराजी दूर करण्यासंदर्भात पाटील यांनी शनिवारी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर महासंघाने पत्रकाद्वारे पाठिंबा जाहीर केला होता.

दरम्यान, परशुराम सेवा संघाचाही उमेदवार रिंगणात असून, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांना पाठिंबा देण्यासंदर्भात ब्राह्मण संघटनांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्राह्मण उमेदवारांकडून माघारी घेण्यात यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून उद्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चित्र स्पष्ट होईल. तूर्तास ब्राह्मण उमेदवार अर्ज माघारी घेणार नाहीत, अशी स्थिती असून, त्याचवेळी विरोधकांकडून बाहेरचा उमेदवार म्हणून पाटील यांची प्रतिमा निर्माण केली गेली आहे. त्यामुळे पाटील यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, ब्राम्हण समाजाकरता परशुमराम विकास महामंडळ स्थापन करावे, ब्राम्हण समाजातील महापुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कायदा करावा अशा विविध मागण्या यावेळी महासंघाच्या वतीने पाटील यांच्याकडे केल्या गेल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!