Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आठवलेंना हव्या होत्या १० जागा मिळाल्या ६ , मराठवाड्यातील दोन जागांचा समावेश, दीपक निकाळजे फलटणहून लढणार

Spread the love

शिवसेना-भाजप महायुतीतील जनाधार असलेल्या रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाला ६ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी आठवलेंनी चार जागांवरील उमेदवारांची घोषणा केली असून रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून आणि रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक निकाळजे फलटणमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. महायुतीची घोषणा झाल्यानंतर जागा वाटपाचे गणित कसे सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र  मित्र पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असून त्यात सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर या जागा रिपाइंला सोडण्यात आल्या असल्याची अधिकृत घोषणा आज, बुधवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वांद्रे संविधान निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे

रामदास आठवले यांनी महायुतीकडे दहा जागांची मागणी केली होती. मात्र त्यांना केवळ सहाच जागा देण्यात आल्या आहेत. महायुतीने आठवलेंसाठी साताऱ्यातील फलटण, सोलापुरातील माळशिरस, भंडारा, नांदेडमधील नायगाव, परभणीतील पाथरी आणि मानखुर्द शिवाजीनगरची जागा सोडण्यात आली आहे. आठवलेंनी यापैकी चार जागांवरील उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. त्यानुसार मानखुर्दमधून गौतम सोनावणे, फलटणमधून दीपक निकाळजे. पाथरी मोहन फड आणि नायगावमधून राजेश पवार लढणार आहेत. दरम्यान, आठवलेंचे हे सहाही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, वरळी, चेंबूर, गोरेगाव, घाटकोपर रमाबाई कॉलनी, चेंबूर, मुलुंड आणि पुण्यातील मतदारसंघ न सोडल्याने आठवले गटात नाराजी निर्माण झाली. ज्या जागा रिपाइंला सोडण्यात आल्या नाहीत, त्या जागांवर रिपाइंतून बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात मित्रपक्षांना १४ जागा सोडण्यात आल्या असून रामदास आठवलेंच्या रिपाइला ६, सदाभाऊ खोत यांच्या रयतक्रांतीला ३, विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला ३ तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला २ जागा भाजपने दिल्या आहेत. त्यामुळे भाजप १५१ तर मित्रपक्ष १४ अशा १६४ जागांचा वाटप बुधवारी करण्यात आले. महायुतीतील शिवसेना १२४ जागांवर लढणार आहे.

सदाभाऊ खोत यांना फलटण, पंढरपूर आणि अक्कलकोट या ३ जागा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच महादेव जानकर यांना दौंड आणि जिंतूर हा मतदार संघ देण्यात आला असून विनायक मेटे यांना वर्सोवा, किनवट आणि चिखली ही जागा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. साताऱ्यातील फलटणच्या जागेबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. तर शिवाजीनगर-मानखुर्द ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. मात्र रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातल्यानंतर ती जागा आठवलेंसाठी शिवसेनेने सोडली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!