Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिग्गज अभिनेता विजू खोटे यांचे निधन

Spread the love

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता विजू खोटे याचे सोमवारी  वृद्धापकाळाने दक्षिण मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते.

विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केलाय. अभिनय कौशल्य, विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम संवादफेकीच्या जोरावर त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी आजवर ‘अंदाज अपना अपना’, ‘गोलमाल ३’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘शराबी’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तुफान लोकप्रियता मिळवली होती.

विजू खोटे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता होते. त्यांनी आपले पिता नंदू खोटे दिग्दर्शित ‘या मालक ‘ ( १९६४) या चित्रपटात मेहमूदसोबत नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी देखील पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. अशी ही बनवाबनवी या चित्रपटात त्यांनी बाली नावाची खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. विजू खोटे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या असल्या तरी ते त्यांच्या “शोले” चित्रपटातील कालियाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जात असत. कालियाचा “सरकार, मैंने आपका नमक खाया है” हा संवाद आता ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सोबतच त्यांची “अंदाज अपना अपना” या चित्रपटातील रॉबर्ट या भूमिकेतील “गलती से मिस्टेक हो गया” हा संवाद खुप लोकप्रिय झाला होता. विजू खोटेनी मराठीत मस्करी, आयत्या घरात घरोबा, धडाका, घनचक्कर, एक गाडी बाकी अनाडी, इना मिना डिका, भूताचा भाऊ, चंगू मंगू, सगळीकडे बोंबाबोंब इत्यादी मराठी तसेच सच्चा झूठा, फांदेबाज मनी है हनी है, हल्ला बोल, शरारत, खिलाड़ी 420, आगाज, हद कर दी आपने, पुकारे, मेला, बेटा हो तो ऐसा, आशिक आवारा, बंजारा, कफन, नागिन, इत्यादी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. चित्रपट, रंगभूमी, दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमातून भूमिका साकारलीय. तसेच काही जाहिरातींमध्ये कामे केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!