Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिखर बँक घोटाळा प्रकरण : शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात येऊ नये – ईडी आणि पोलिसांची विनंती, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

Spread the love

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार असले तरी त्यांना  चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांनी ईडी कार्यालयात येऊ नये अशी विनंती ईडी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.  दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईत तणावाची परिस्थिती असून पोलिसांनीही पवारांना आपला निर्णय बदलण्याची विनंती केली आहे. राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

या प्रकारणावर राहुल गांधी यांनी म्हटले आहे कि , आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना सत्ताधाऱ्यांनी लक्ष केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने सुडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ हिंगोली-जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली-नांदेड रस्त्यावरील खटकाळी बायपास रोडवर टायर जाळून रस्तारोको आंदोलन केले.  राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव जावेद राज यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी   सरकारच्या विरोधात घोषणाबाजी  केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. मात्र शरद पवार घराबाहेर पडल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरद पवार यांनी आज घराबाहेर पडू नये, यासाठी पोलीस सहआयुक्त पवार यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी जाऊन विनंती करणार आहेत.

राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे नोटीस बजावण्याआधीच ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. मात्र पवारांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

शरद पवार अद्यापही ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलाम लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,’ असं आवाहन शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!