Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुण्या बरोबरच पुढील चार तासात मुंबई आणि उपनगरही पावसाचा धडाका, १२ जणांच्या मृत्यूची नोंद

Spread the love

पुण्यात बुधवारी रात्री दोन- अडीच तास तुफान कोसळलेल्या पावसाने हाहाकार उडाला असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई वेधशाळेनं पुढच्या ४ तासांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा दिला आहे. पुणे महापालिकेनं कालच्या पावसाचा धसका घेऊन आज वेळीच इशारा जारी केला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

याशिवाय मुंबई आणि उपनगरांबरोबरच पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असं ट्वीट पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने केलं आहे.

मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रौद्ररूप  धारण केले . सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. तर मनुष्यहानीसह जनावरंही दगावली आहे. पाण्याच्या वेगात कात्रज भागात पन्नासहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहून गेल्या आहेत. मदतकार्य मोहिमेदरम्यान एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाला आणखी सिंहगड परिसर आणि सहकार नगरात दोन मृतदेह सापडले होते. त्यानंतर मृतांचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात पावसामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, जळगावमध्येही वीज पडून पाच जण मरण पावले आहेत.

पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात ५१ ते ७५ टक्के पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुण्यात यंदाच्या पावसाळ्यातील एक हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने बुधवारी गाठला. एक जूनपासून ते २५ सप्टेंबरपर्यंत शहरात १०१८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

परतीच्या पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे.  पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; तर त्यानंतर महिनाखेरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडत राहील.

पुणे शहरातील दांडेकर पुल परिसरातील घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री घरांमध्ये पाणी साचले होते. गुरूवारी दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. पाणी कमी होत चालले असले तरी घरांमध्ये चिखल झाला आहे.

दरम्यान बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे झालेल्या हानीची माहिती आता हळूहळू समोर येत आहेत. पावसामुळे पुण्यात प्रचंड वित्त आणि जीवित हानी झाली आहे. याबरोबर पुण्यातील वेगवेगळ्या भागात एक हजाराहून अधिक जनावरे दगावली आहेत. एकट्या सहकार नगरातील श्री दुग्धालय डेअरीतील शंभर जनावरे मरण पावली आहेत. यात 25 गाईसह म्हशींचाही समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!