Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिखर बँक घोटाळा प्रकरण : ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य, स्वतःहून ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची आणि पाहुणचाराची तयारी : शरद पवार

Spread the love

मी महात्मा फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानाबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी तपासाला सहकार्य करणार. पण एक सांगतो, हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही. : शरद पवार


विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या गदारोळात आपला प्रचाराचा कार्यक्रम काही काळ बाजूला ठेवत बहुचर्चित विषयाच्या अनुषंगाने आपली बाजू मांडण्यासाठी शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीनं माझ्यावर जो गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणात चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय जाहीर केला तसेच निवडणूक प्रचारासाठी  मी मुंबईच्या बाहेर असेल, त्यामुळं मी स्वतः २७ सप्टेंबरला मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होईल. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची तयारी आहे, असे निवेदन केले. 


ईडीला संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. नक्की गुन्हा काय आहे, हे मला समजावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ईडीच्या अधिकाऱ्यांना जी काही माहिती हवी असेल ती देईन, शिवाय अन्य काही पाहुणचार त्यांना करायचा असेल तर त्यासाठीही माझी तयारी आहे.


याविषयी बोलताना पवार म्हणाले कि , ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांत माझंही नाव आहे. माझ्या आयुष्यातील हे दुसरं प्रकरण आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे काल संध्याकाळी कळलं. त्यांच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे, असं पवार यांनी यावेळी सांगितलं. पुढील काही दिवस मी निवडणूक प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नसेल किंवा कोणत्या अदृश्य ठिकाणी गेलो तर, त्याआधीच २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात मी स्वतःहून जाणार आहे. अधिकाऱ्यांना माझ्याकडून जी माहिती हवी आहे ती देईन. त्यांना जो काही पाहुणचार करायचा असेल तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असंही ते म्हणाले. ईडीला सहकार्य करण्यासाठी माझे हात सदैव तत्पर असतील, असंही ते म्हणाले.


शिखर बँकेच्या तथाकथित भ्रष्टाचारप्रकरणी माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होण्याची माझ्या आयुष्यातील ही दुसरी घटना. १९८० साली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जळगाव ते मुंबई शेतकरी दिंडी काढली तेव्हा आम्हाला अटक झाली होती. त्यानंतर गुन्हा दाखल होण्याचे हे दुसरे प्रकरण आहे.


गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे पाहिल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई केल्याची शंका आपण म्हणता तशी अनेकांना येते. मला त्याबाबत अधिकृत माहिती नाही. सत्ताधाऱ्यांना सहाजिकच अधिक माहिती असेल, असा चिमटाही पवार यांनी यावेळी काढला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातली महत्वाची बँक आहे. शेती उद्योगात अर्थसहाय्य करण्याची भूमिका घेते. बँकेच्या संचालक मंडळामध्ये एका पक्षाचे नेते नव्हते. या बँकेत पक्षीय विचार बाजूला ठेवून काम करण्याची पद्धत आहे. या मंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह अनेक पक्षांचे नेते होते. ५० संचालकांची निवड बिनविरोध झालेली आहे. माझ्यापुरते म्हणाल तर, मी कधीही संचालक राहिलेलो नाही. परंतु संस्थांचे प्रश्न माझ्याकडे आले तर केंद्र आणि राज्य सरकारशी बोलण्याची माझी भूमिका राहिली आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!