Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : खळबळजनक : चिकलठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

Spread the love

औरंंगाबाद शहराच्या  चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सिडको एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविण्यात आले आहेत.


दिनकर भिकाजी बोर्डे (वय ५०), कमलबाई दिनकर बोर्डे (वय ५०), भगवान दिनकर बोर्डे (वय २६) सर्व राहणार दत्त नगर, चौधरी कॉलनी अशी मयतांची नावे आहेत. मारेकरी अमोल भगीरथ बोर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे.

चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत राहणाऱ्या बोर्डे कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेद्र माळाळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घर उघडून बघीतले असता, घरात सर्वत्र रक्त पसरले होते. तर तीन जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीवरून आरोपी अमोल बोर्डे हा मयत कुटुंबीयांचा शेजारी असून  बोर्डे कुटुंबाचा आणि अमोल बोर्डेचा क्षुल्लक कारणावरून गल्लीत वाद झाला. वादाचे रुपांतर शिवीगाळ आणि भांडणात झाले. माथेफिरू अमोल बोर्डे याने रागाच्या भरात घरी जाऊन चाकू आणला व बोर्डे यांच्या घरात प्रवेश करीत दिनकर भिकाजी बोर्डे (वय ५०), कमलबाई दिनकर बोर्डे (वय ५०), भगवान दिनकर बोर्डे (वय २६ या तिघांवर चाकूने सपासप वार केले आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला. किरकोळ भांडणावरून तिघांचा खून करण्यात आल्याची माहिती पसरताच या परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. अमोल बोर्डेने रागाच्या भरातून हे कृत्य केले आहे की आणखी यामागे अन्य कारण आहे, याचा तपास पोलीस घेत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!