Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha 2019 : भाजपकडून सेनेला १४४ जागा दिल्या नाही तर तुटू शकते युती : रावते , संजय राऊत

Spread the love

भाजप शिवसेनेच्या जागा वाटपावरून सध्या शिवसेना आक्रमक असली तरी भाजप हे सर्व प्रकरण सबुरीने घेत आहे , दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४४ जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असं विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली. रावते यांच्या या भूमिकेचं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. रावते काहीच चुकीचे बोलले नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेमुळं युतीच्या जागावाटपाचा तिढा आणखी वाढला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपावर अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सहमती होऊ शकली नाही. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी १४४ जागांची मागणी केली आहे. ‘शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटू शकते,’ असं रावते म्हणाले. त्यांच्या या विधानाचं खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. ‘अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष फिफ्टी-फिफ्टी जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यामुळे रावते जे बोलले त्यात काहीच गैर नाही,’ असं राऊत म्हणाले. निवडणुका सोबतच लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभेच्या २८८ पैकी पक्षाला किमान १३५ जागा हव्या आहेत आणि भाजपनंही तितक्याच जागांवर लढावं. तसंच उर्वरित १८ जागा घटक पक्षांना देण्यात याव्यात, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं सूत्रांकडून समजतं. मात्र, भाजपला हा फॉर्म्युला मान्य नाही. भाजपला शिवसेनेसाठी १२० पेक्षा अधिक जागा सोडायच्या नाहीत आणि शिवसेनेला ते मान्य नाही, असं शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं. दुसरीकडे भाजपला शिवसेनेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे असं भाजपच्या एका नेत्याचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा जिंकता आल्या. त्यामुळं शिवसेनेपेक्षा भाजपला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिकाही या नेत्यानं मांडली. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या भूमिकेमुळं युतीच्या जागावाटपाचा तिढा आणखीनच वाढला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!