Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnatak मोठी बातमी : ” या ” मतदारसंघातील गावात अजूनही पाळली जाते अस्पृश्यता , भाजप खासदाराला केला गावप्रवेशास केला मज्जाव !!

Spread the love


भारतात लोकशाही आणि समानतेच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी कुठे उघड उघड तर कुठे छुप्या पद्धतीने जातीयवाद आणि अस्पृश्यता पाळली जात आहे याचा प्रत्यय येणारी घटना पुन्हा एकदा कर्नाटकातील एका खेड्यात घडली आहे. या घटनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या दलित खासदाराला गावात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचे  धक्कादायक वृत्त आहे. गावात प्रवेश न करताच अखेर नारायणस्वामी तेथून निघून गेले. आपल्याला जबरदस्ती किंवा पोलिसांच्या मदतीने गावात प्रवेश करायचा नव्हता असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. “मला त्यांची विचारसरणी बदलायची आहे. याप्रकरणी मी कोणतीही तक्रार दाखल करणार नाही. अस्पृश्यता हे सत्य आहे. मन बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. कायदा हे बदलू शकत नाही,” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.


नारायणस्वामी काही डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावाला भेट देण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. बेघर असणाऱ्यांसाठी घरं बांधून देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ते गेले होते. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. सोमवारी नारायणस्वामी बायकॉन कंपनीचे प्रतिनिधी आणि नारायण सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या काही प्रतिनिधींना सोबत घेऊन परिसराची भेट देण्यासाठी गेले होते. गावाचा विकास करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

खासदार नारायणस्वामी अधिकाऱ्यांना घेऊन पोहोचले तेव्हा ग्रामस्थांनी तुम्ही अस्पृश्य असल्याचं त्यांना प्रवेश नाकारला. नारायणस्वामी यांच्यासोबत आलेल्या लोकांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गरिबांची मदत करण्यासाठी ते आले आहेत असं सांगत त्यांना प्रवेश द्या अशी विनंती करण्यात आली. पण गावकरी तयार झाले नाहीत. त्यांनी गावाबाहेर एक खुर्ची ठेवली आणि नारायणस्वामी यांना तिथेच थांबण्यास सांगितलं. दरम्यान नारायणस्वामी यांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. काही वेळाने काही ग्रामस्थांनी त्यांना गावात प्रवेश कऱण्याची विनंती केली पण नारायणस्वामी यांनी नकार दिला. आपल्यामुळे गावात उगाच तंटा नको असल्याचं त्यांनी सांगितलं.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्याच्या एका गावातील ही घटना आहे. ए. नारायणस्वामी असं भाजप खासदाराचं नाव आहे. ए. नारायणस्वामी केवळ अस्पृश्य जातीशी संबंधित असल्यानं त्यांना गावात येण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पावागाड़ा तालुक्यातील गोलारहट्टी गावातला हा प्रकार आहे. या घटनेबाबत भाजप खासदार ए. नारायणस्वामी यांनी सांगितले की, ते अधिकाऱ्यांसह गोला समुदायाच्या गोलारहट्टी गावात ते गेले होते. पण अनुसूचित जातीचा असल्यानं काही लोकांनी त्यांना गावात प्रवेश करण्यास मनाई केली.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असली तरी आपल्याला कोणाचीही तक्रार करायची नाही असा पवित्रा घेत त्यांनी माझ्यामुळे गावात कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, गावकऱ्यांमध्ये वाद होऊ नयेत, यासाठी गावाबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं नारायणस्वामींनी सांगितलं.

ए. नारायणस्वामी हे चित्रदुर्गचे भाजपचे खासदार आहेत. नारायणस्वामी गोलारहट्टी येणार असल्याची बातमी गावकऱ्यांना आधीच मिळाली होती. भाजप खासदार तेथे पोहोचण्यापूर्वीच काही लोक गावाबाहेर हजर होते. जसे नारायणस्वामी तेथे दाखल झाले तसं गावकऱ्यांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितलं. गोलारहट्टी गावात कोणत्याही मागास  किंवा कथित खालच्या जातीतील व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई असल्याचं गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं. या दरम्यान काही लोकांनी नारायणस्वामी यांना आपल्या घरात थांबवण्याची विनंती केली. पण यासही काही जणांनी कडाडून विरोध केला.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!