Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मध्यरात्री उशिरा दिला खासदारकीचा राजीनामा , अमित शाहांच्या निवासस्थानी सकाळी ९ वाजता होतोय उदयनराजेंचा भाजप प्रवेश

Spread the love

साताराचे खासदार उदयन राजे भोसले यांनी आज मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन उदयन राजे यांनी खासदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन हेही उपस्थित होते. सातारा येथील लोकसभेची निवडणूक आता विधानसभेसोबत होते, की नंतर याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल.

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले पुणे विमानतळाहून चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना झाले होते . आज शनिवारी सकाळी ९ वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी उदयनराजेंचा भाजप प्रवेश प्रवेश होईल. त्यापूर्वी उदयनराजे  त्यांच्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द करतील. पुण्याहून जाताना उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राज्यसभा खासदार अमर साबळे उपस्थित होते.

“आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे, आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”, असे ट्विट करत उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना भाजप प्रवेशाची माहिती दिली.

उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला पुन्हा फोडणी दिली. उदयनराजे हे भाजपात येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

लोकसभेत तीनदा लोकप्रतिनिधित्व करणारे उदयनराजे यांचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांशी कधीच पटले नाही. उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील कलगीतुरा चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकमात्र अपवाद वगळता स्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे कधी जमलेच नाही. राज्यात सन १९९५च्या युतीच्या राजवटीत दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनानुसार उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना महसूल राज्यमंत्री करण्यात आले होते. सातारचे राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद लेवे हत्या प्रकरणात ते अनेक दिवस अडकले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावेळी उदयनराजे यांचा पश्चिम महाराष्ट्रात फायदा होण्याऐवजी राजकीय उपद्रव वाढल्यामुळे भाजपने त्यांना दूर लोटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!