Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खा.उदयनराजे यांच्यानंतर सेनेचे टार्गेट पंकज आणि छगन भुजबळ , शरद पवार यांच्याशी झाली बंद खोलीत चर्चा !!

Spread the love

छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय आहे याचा कुणालाच थागपत्ता लागत नाही . या सगळ्या राजकीय चर्चेवर छगन यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखीच बुचकळ्यात टाकणारी आहे. तुमच्या शिवसेना प्रवेशाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली असा थेट प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले ‘मै यही हु, मै यही हु, मै यही हु.’  पण शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचं खंडन मात्र त्यांनी केलं नाही.


सातारचे खासदार उदयनराजे भाजपात गेल्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे  शिवसेनेत जाणार असल्याची चर्चांनी  पुन्हा जोर धरला आहे. दरम्यान छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. पवारांकडून भुजबळांची मनधरणी सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

या भेटी संदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांबाबत शरद पवारांशी चर्चा झाली. कोणाचीही मनधरणी  राष्ट्रवादीकडून केली जात नाही आहे. ज्याला जायचे ते जातील दुसरा उमेदवार लढायला तयार आहे, राजा गेला.. तो जायला नव्हता पाहिजे, पण असो, प्रजा आमच्यासोबत आहे. सातारा आमचा किल्ला म्हणूनच राहील, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून आणि नाशिकच्या काही सेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. मात्र दुसरीकडे छगन भुजबळ त्यांच्या येवला मतदारसंघातील शिवसैनिकांनी त्यांना पक्षात येण्यासाठी आग्रह धरला आहे. भुजबळ हे विंचूर भागात विकास कामांच्या उद्घाटनांसाठी आले असता येवला मतदारसंघातील असंख्य शिवसैनिकांनी कार्यक्रमाच्या स्थळी येऊन त्यांची भेट घेतली व त्यांनी सेनेत लवकरात लवकर प्रवेश करावा यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भुजबळांना भगवी शाल देऊन साकडेही घातले. छगन भुजबळांनी मात्र कार्यकर्त्या सोबत फक्त हस्तांदोलन केलं. सेना प्रवेशा बाबत मात्र त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले नाही.  परंतु छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश हा नक्की समजला जात आहे. मात्र तो केव्हा होणार याबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. भुजबळ हे पंकज आणि समीर यांच्यासह शिवसेनेत येतील असा अंदाज आहे. याबाबतही बोलणी पूर्ण झाली असल्याचीही चर्चा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!