Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

परवानगीविना पुतळा बसवला आमदारांसह ४४ कार्यकर्त्यांना अटक

Spread the love

अंबड शहरातील जालना रोडवरील पाचोड चौकात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका आयशर वाहनातून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून बसविण्यात आला. या प्रकरणात भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यासह ४४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बसविण्यासाठी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा विनापरवाना बसविण्यात आला. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पोलिसांनी पुतळा बसविण्याचे काम करीत असलेल्या कुचे यांच्यासह ४४ जणांना ताब्यात घेतले.

पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य पुतळ्याचा पावित्र्यभंग प्रतिबंध अधिनियम कलम ११, भादंवि. १४३, १४९, १८८, ४४७ आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक सी. डी. शेवगण, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा शहरात तैनात आहे.

‘अंबड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. लोकांची खूप दिवसांची ही मागणी होती. ती आज आम्ही पूर्ण केली,’ अशी प्रतिक्रिया कुचे यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!