Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवरच गुलाल उधळल्याने काही काळ तणाव , जीव रक्षकांनी बुडणारांना वाचवले

Spread the love

गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात  दिवसभरापासून मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी गणेश विसर्जनादरम्यान अप्रिय घटना घडल्याने गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. एका विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवरच गुलाल फेकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्या एका घटनेत विसर्जनावेळी तलावात बुडणाऱ्या तरुणाला अग्निशमन दल आणि जीवररक्षकांनी वाचवलं. तर तिसऱ्या घटनेत बोट उलटल्याने पाण्यात बुडणाऱ्या तीन जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

पुण्याच्या लक्ष्मी रोडवर गणेश विसर्जन मिरवणुकीत गुरुजी तालिम मंडळाचा मानाचा तिसरा गणपती सहभागी झाला होता. यावेळी गुरुजी तालिम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त गुलालाची उधळण सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना गुलालाची उधळण न करण्याची विनंती केली. मात्र काही कार्यकर्त्यांनी पोलिसांचं न ऐकत थेट पोलिसांवरच गुलाल उधळला आणि पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दुसरी घटना वृद्धेश्वर घाटाजवळ घडली. वृद्धेश्वर घाटाजवळ गणेश विसर्जन करत असताना एक तरुण बुडाला. हा तरुण बुडत असल्याचे पाहून घाटावरील भाविकांनी आरडाओरड केल्याने अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षकांनी तात्काळ पाण्यात उडी मारून या तरुणाला वाचवलं. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे आणि जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर आणि चौगुले यांनी या तरुणाला वाचवलं. अग्निशमन दलाने सलग तीन दिवसात एक महिला आणि दोन पुरुषांचे जीव वाचवले आहेत. तर सायंकाळी सहा वाजता गणेश विसर्जन सुरू असताना अमृतेश्वर घाटावर एक बोट पाण्यात पलटी झाली. अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे आणि जीवरक्षकांनी तात्काळ पाण्यात उडी मारून या बोटीतील तीन पुरुषांचे प्राण वाचवले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!