Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mumbai : श्री गणेशाचा विसर्जनासाठी मुंबईत ५० हजार पोलिसांचा ताफा तैनात , सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

Spread the love

उद्या गुरुवारी मुंबईभरातील चौपाट्या आणि तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यात येणार असल्याने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जन मिरवणुकांवर विरजन येऊ नये म्हणून संपूर्ण मुंबईत ५० हजार पोलीस तैनात करण्यात येत आहेत तसेच विसर्जन सोहळा आणि मिरवणुकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत १२९ ठिकाणी गणेश  विसर्जन करण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा बीच आणि मार्वे बीच येथे मोठ्याप्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते. लालबागच्या राजचे विसर्जनही १२ व्या दिवशीच करण्यात येते. यावेळी प्रचंड मोठी विसर्जन मिरवणूक निघते. या मिरवणुकीमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. त्यामुळे या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत लालबागच्या राजाप्रमाणेच अनेक गणेश मंडळाच्या मिरवणुका निघत असतात. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्बशोधक आणि निरोधक पथक, शीघ्रकृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

उद्या गणेश विसर्जनाच्या वेळी चौपाट्यांवर आणि मिरवणुकांमध्ये साध्या वेषातील पोलीस तैनात असतील. महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी हे पोलीस खासकरून तैनात असतील. मुंबईतील सर्व विसर्जनस्थळी सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्यावरूनही देखरेख करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

असा राहील बंदोबस्त…

विसर्जन मिरवणुकांसाठी ५३ रस्ते बंद ठेवण्यात येणार आहे

तर ५६ रस्त्यांवर एक मार्गिका सुरू ठेवण्यात येणार आहे

अवजड वाहतुकींसाठी १८ रस्ते बंद करण्यात आले असून ९९ ठिकाणी पार्किंगला मनाई करण्यात आली आहे

भायखळ्याचा रेल्वे पूल, अर्थरोड रेल्वे पूल, करिरोड आणि जुहू तारा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. १६ टनापेक्षा अधिक अवजड सामान घेऊन जाणाऱ्या वाहनांना या पुलांवरून बंदी घालण्यात आली आहे.

या रेल्वे पुलावरून जाणाऱ्या विसर्जन मिरवणुकांदरम्यान काही गडबड झाल्यास संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे

विसर्जनादरम्यानच्या मिरवणुकांदरम्यान महिलांची छेडछाड, पाकीटमारी आदींसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवणार

चौपाट्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्रेही उभारण्यात आली आहेत. याशिवाय चौपाट्यांवर बॅरिकेटिंग करण्यात आली असून, जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!