Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या १६८० कोटी ५० लाखांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी : राज्यमंत्री अतुल सावे

Spread the love

औरंगाबाद : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेला अखेर मंजुरी मिळाली आहे. १६८० कोटी ५० लाखांच्या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवालावर (डीपीआर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी झाली आहे. आता लवकरच निविदा प्रक्रिया करून कामाला सुरूवात होईल. नवीन पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी सतत पाठपुरावा केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाली.

शासनाच्या मंजुरीसाठी ३ ऑगस्टला हा अहवाल पाठवण्यात आला होता. यावर सोमवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक झाली. यात डीपीआरचे अंतिम सादरीकरण झाले होते. पीपीपी तत्त्वावरील समांतर जलवाहिनी योजनेला मूठमाती दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मनपाने शहराच्या पाणीपुरवठ्याचा एकत्रित आराखडा तयार केला. त्याला वाढीव पाणीपुरवठा योजना, असे नाव दिले आहे.

यश इनोव्हेशन सोल्यूशन्स या कंपनीच्या माध्यमातून वाढीव पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तयार केला आहे. या डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मान्यता आवश्यक होती. त्यासाठी पालिकेने डीपीआर प्राधिकरणाकडे पाठवला. पालिकेने डीपीआर तांत्रिक मान्यतेसाठी प्राधिकरणाला सादर केल्यावर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी डीपीआरमध्ये त्रुटी काढल्या. सुधारित डीपीआर पाठवल्यानंतर सर्व बाबी तपासून त्यास जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली.

शहराच्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी :

यासंदर्भात बोलताना राज्यमंत्री अतुल सावे म्हणाले की, शहरात मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना करणे अत्यंत गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने शहराला आता वाढीव पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला. विधानसभा आचारसंहितेपूर्वी या योजनेला मान्यता मिळाल्याने आता कामाला लवकरच सुरूवात होईल. शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्याची गरज लक्षात घेता ही योजना फार उपयोगी ठरणार आहे. सतत पाठपुराव्यामुळे शहरवासीयांना मुबलक पाणी मिळेल. जायकवाडीपासून शहरापर्यंत आणि शहरातील अंतर्गत पाइपलाइन या योजने अंतर्गत करण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!