Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विधानसभा निवडणुकीसंदर्भांत प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या वतीने केला मोठा खुलासा !!

Spread the love

‘राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली आहेत,’ असं ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलं. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील एका पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी ही घोषणा केली.

‘लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसबरोबर युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. पण ३ ते ४ महिने त्यांनी आम्हाला खेळवत ठेवलं. आताही काँग्रेसच्या वागणुकीत काही फरक पडलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करणार नाही,’ अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. आम्ही त्यांना प्रस्तावही दिला. मात्र त्या प्रस्तावाचं अजूनही उत्तर आलेलं नाही. आता आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्यात रस नाही,’ असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या चर्चेची दारं बंद केली आहेत.

भारिप बहुजन महासंघ व ‘एमआयएम’च्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती. औरंगाबादमध्ये आघाडीचा खासदारही निवडून आला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला विशेषत: प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरू केले होते. मात्र, राष्ट्रवादीला वगळून काँग्रेससोबत युती करण्यात आंबेडकरांना रस होता. त्यासाठी त्यांनी थेट ५० टक्के जागांची मागणी काँग्रेसकडं केली होती. त्याला काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आंबेडकरांनी  स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली.

‘वंचित’नं युतीसाठी काँग्रेसपुढं जाचक अटी ठेवल्याचा आरोप आंबेडकर यांनी फेटाळून लावला. ‘ज्या जागांवर काँग्रेसचा तीनपेक्षा अधिक वेळा पराभव झाला आहे, त्या जागा आम्ही मागितल्या होत्या. हरलेल्या जागा मागणं यात जाचक काय आहे,’ असा प्रतिप्रश्न आंबेडकर यांनी केला. खरंतर काँग्रेसच्या वागणुकीत अद्याप कोणताही फरक पडलेला नाही. त्यांच्याकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगमुळं आम्हीच काय, इतर घटक पक्षही त्यांच्यासोबत जात नाहीत,’ असा दावा त्यांनी केला.

अनंत चतुर्दशीनंतर ‘वंचित’च्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असं आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. ‘१४४-१४४ जागांचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसपुढं ठेवला होता. मात्र, त्यास काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आम्ही आता चर्चा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य जे पक्ष येतील, त्यांना सोबत घेऊ,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!