Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur : वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन महारॅलीला आजपासून प्रारंभ

Spread the love

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रॅली काढण्यात येत आहे. भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा व वंचितचे प्रणेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आणि भारिपच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी सकाळी ११ वाजता संविधान चौकातून ‘सत्ता संपादन महारॅली’ला प्रारंभ होईल.

प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने लोकसभा निवडणुकीपूर्वी समविचारी संघटना व एमआयएमसह अन्य पक्षांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत आघाडीला उल्लेखनीय मते मिळाली. आता विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना एमआयएमने दोन दिवसांपूर्वी आघाडीतून माघार घेतली. असे असले तरी वंचितने पूर्ण उत्साहात यात्रेची तयारी केली आहे. अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या रॅलीत जिल्ह्यातील नेते सहभागी होणार आहेत. रॅलीसाठी खास रथ तयार करण्यात आला आहे. नागपूर, हिंगणा, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम या मार्गे रॅली जाईल. मार्गातील प्रमुख शहरात सभा होणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे समारोप होईल.

रॅलीच्या तयारीसाठी प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे व शहराध्यक्ष रवी शेंडे यांच्या उपस्थितीत रविभवनात बैठक झाली. यात रॅली यशस्वी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच, येत्या १४ सप्टेंबर रोजी भारिपचे तरुण नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला. विविध समाजातील तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. बैठकीस शहर सरचिटणीस अरुण फुलझेले, भूषण भस्मे, संघटक आनंद चौरे, राजेश भंडारे, धर्मपाल वंजारी, प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!